मुंबई, 04 जुलै : राज्यात आज खऱ्या अर्थाने मान्सूनचा पाऊस
(Monsoon Update) सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कोकणात येत्या 4 ते 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. तर मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज मुंबईजवळ भिवंडी परिसरात पावसाने नागरिकांची तारांबळ उडला.
पावसाने झोडपलं, पालिकेकडून दुर्लक्ष
आज मुंबईसह उपनगरात पावसाने चांगलच झोडपलं. त्यामुळ अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. भिवंडी परिसरात आताही मुसळधार पाऊस सुरू असून शेकडो दुकानांत, घरात पाणी शिरले आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचलेले पाहावयास मिळत असून अनेक नागरिक अडकून पडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनामार्फत कोणतीच मदत मिळत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे.
पनवेल आणि परिसरात सध्या मुसळधार
पनवेल आणि परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. येथील खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या खालचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. कामावरून परतणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत असून प्रवाशी पाण्यातून वाट काढत चालले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पनवेल परिसरात अजूनही जोरदार पाऊस (Mumbai Rain) सुरूच आहे. स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून NDRF पथके राज्यात विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. मुंबईसाठी 5 पथके, नागपूरला एक टीम, चिपळूणसाठी एक टीम, रत्नागिरी आणि महाड रायगड साठी एक टीम देण्यात आली आहे.
रत्नागिरी : कोकणात पावसाचा हाहाकार; जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, स्थानिकांना हाय अलर्ट जारी
दरम्यान, पुढील 5 दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अधिक सक्रिय होण्याची स्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड भागात होऊ शकते. परिणामी महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.