मुंबई, 10 ऑगस्ट : मुसळधार पावसात नि:स्वार्थीपणे केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभा राहणाऱ्या 50 वर्षीय महिलेनं मुंबईकरांसमोर वेगळा आदर्श घालून दिला आहे. या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा कुसुमाग्रजांची कविता आठवली. भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले… मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा…! 3 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसधार पावसानं तुळसी पाईप रोडवर तुफान पाणी साचलं होतं. आजूबाजूच्या गाड्याही पाण्यावर तरंगण्याच्या स्थितीत होत्या. पाणी ओसरण्याची काही चिन्हं नाहीत हे पाहून त्यांनी एका तरुणाच्या मदतीनं मॅनहोलचं झाकण उघडलं. मात्र वाढणारं पाणी आणि प्रवाह पाहून त्यांना संभाव्य धोके लक्षात आले. कांता मारूती कलन यांना 2017 मध्ये मॅनहॉलचं झाकण उघडलं असल्यानं एका डॉक्टरचा पडून मृत्यू झाल्याची घटना डोळ्यासमोर आली. मुसळधार पावसात पुन्हा एकदा अनर्थ घडू नये यासाठी त्या तब्बल 7 तास रस्त्यावर उभं राहून वाहनांना पाण्यातून वाट दाखवत होत्या. एकीकडे या पावसात कांता यांचं घर वाहून गेलं. मुलीच्या शिक्षणासाठी साठवलेले पैसे आणि घरातलं सामान पावसानं नेलं. कांता या रस्त्यावर दुपारी पाणी ओसरेपर्यंत वाहनांना वाट दाखवत होत्या. घरी आल्यावर आपला मोडलेला आणि वाहून गेलेला संसार त्यांना दिसला.
हे वाचा- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा मुंबई मिरर नं दिलेल्या वृत्तानुसार या संपूर्ण घटनेनंतर कांता यांना महापालिका कर्मचाऱ्यांनी मॅनहोलचं झाकड उघडल्याबाबत जाबही विचारला, पाणीपातळी वाढत होती आणि पालिकेचे कोणीही कर्मचारी आली नाहीत त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शिवाय कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी त्या उभ्या असल्याचं पालिका कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितलं. कांता यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं पोलीस, स्थानिक नागरिक, मुंबईकर आणि सोशल मीडियावरही तुफान कौतुक होत आहे. कांता यांचा सगळा संसार मात्र या पावसानं वाहून गेला पण कोणताही अनर्थ घडू नये म्हणून त्यांनी जे केलं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.