मुंबई 03 डिसेंबर: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या 10 दिवसांमध्ये पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात 8066 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 17,03,274 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5182 रुग्णांची नव्याने भर पडली. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 18,37,358 झाली आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असून 115 जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 47,472 एवढी झाली आहे.
कोरोना विषाणूची (Corona Virus) दुसरी लाट तीव्र होण्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना अर्थात (WHO) ने मास्क वापरण्याबाबत अधिक काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी मास्क (Mask) वापरण्याबाबतच्या अधिक कठोर सूचना जारी केल्या आहेत.
ज्या भागात कोविड 19 चा (Covid 19) संसर्ग पसरत आहे, तिथं असलेल्या आरोग्य केंद्रामधील प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. या आधी जूनमध्ये जारी केलेल्या सूचनांमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने कापडी मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचे म्हटले होते. विशेषतः जिथे कोरोनाचा फैलाव अधिक आहे, तिथं हे आवश्यक आहे. आता संघटनेने नवीन नियम जारी केले आहेत.
मास्क वापरण्याबाबत नवीन सूचना
सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या भागात कोरोनाचा संसर्ग अधिक आहे, त्या भागात 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसह सर्वांनी फेसमास्क वापरणं अनिवार्य आहे. दुकाने, कार्यालये, शिक्षण संस्था अशा ठिकाणी वातानुकुलन यंत्रणा बंद असेल तर मास्क लावणे अत्यावश्यक आहे.