वातावरण बदलाच्या लढ्याला गती देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्याच्या कांदळवन कक्षाने मारंबळपाडा, विरार येथे मुंबई महानगर प्रदेशातील पहिले इको टुरिझम गाव विकसित करण्याची योजना आखली आहे.
मारंबळपाडा येथील कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय केंद्र हे या परिसरातील इको-टुरिझम विकास करण्याच्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे.
येथे भेट देणाऱ्यांसाठी स्थानिक आणि त्यांची संस्कृती, कांदळवन आणि अनुषंगिक जैवविविधता या बाबतच्या माहितीचे आकर्षक पद्धतीने मांडलेले प्रदर्शन पाहायला मिळेल.
येथे भेट देणाऱ्यांसाठी कांदळवनात बोटीतून सफर, निसर्ग भटकंती, पक्षी निरीक्षण, मॅनग्रोव्ह बोर्डवॉक, बेटाला भेट असे अनेक उपक्रम विरार परिसरात उपलब्ध असतील.
हे ठिकाण विरार रेल्वे स्थानकापासून फक्त पाच किमीवर असून हिरवीगार भातशेती, प्राचीन मंदिरे, खाडीच्या बाजूने असलेली कांदळवनांची सीमा आणि घनदाट कांदळवनांनी आच्छादलेले बेट यामुळे हा भाग लगतच्या शहरी दृश्यापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो.