मंत्रालयात पुन्हा खळबळ, एकाच विभागात 8 कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

मंत्रालयात पुन्हा खळबळ, एकाच विभागात 8 कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

मंत्रालयात महसूल विभागात 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच  राज्यातील मुख्यालय समजल्या जाणाऱ्या मंत्रालयात महसूल विभागात 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तसंच महसूल विभागातच आणखी आठ ते नऊ लोकांना ताप, थंडी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे आढळल्याची देखील माहिती समोर येत आहे.

प्रशासकीय आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ माजली असून पुढील काही दिवसात मंत्रालयात पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवेशाला देखील मर्यादा आणण्याचा विचार सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

धार्मिक सामाजिक-राजकीय कार्यक्रम, जत्रा-यात्रा रद्द कराव्यात अशा स्वरूपाचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे मार्च 1 पर्यंत सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार हे दररोज वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा कार्यक्रमात सहभागी होत असतात. पवार यांच्याबरोबर अनेक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात. सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन; Covid-19 अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक

राज्यातील गेल्या तीन दिवसांमध्ये चार कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक मंत्री आहेत. जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व मंत्री विलगीकरणामध्ये असून या सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.

राज्यात मागील आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या साधारण दोन हजाराच्या आसपास होती. पण काल एका दिवसात जवळपास सात हजार रुग्ण नव्याने आढळले आहेत. राज्यामध्ये ठाणे, मुंबई, पुणे, अमरावती या शहरांमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अधिक आढळत असून ॲक्टिव रुग्ण देखील या शहरांमध्ये सर्वाधिक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे सार्वजनिक राजकीय कार्यक्रम एक मार्चपर्यंत रद्द केले असले तरी इतर मंत्रीही पवार यांच्यासारखाच निर्णय घेतात का, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: February 22, 2021, 4:21 PM IST

ताज्या बातम्या