मुंबई, 17 जानेवारी : कोरोनाचं संकट पूर्णपणे दूर झालेलं नसतानाच भारतातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा वेगाने प्रसार होऊ लागला आहे. महाराष्ट्रातीलही विविध जिल्ह्यांमध्ये या रोगाने शिरकाव केला आहे. 8 जानेवारीपासून राज्यात आजपर्यंत 5 हजार 987 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली असून 16 जानेवारीपर्यंत एकूण 836 पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
याआधी पाठवलेल्या नमुन्यांच्या तपासण्यांचे निष्कर्ष भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थाकडून आले असून मुंबई, घोडबंदर, दापोली या ठिकाणचे कावळे-बगळे तसंच परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथील पोल्ट्री फार्म नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय परभणी, लातूर आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी व दौंड तालुका, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बीड जिल्ह्यातील लोखंडी, सावरगाव, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, रायगड जिल्ह्यातील पेण येथील नमुन्यांचा समावेश यात आहे.
राज्यातील सात जिल्ह्यातील कुक्कुट पक्षांचे नमुने बर्ड फ्ल्यूसाठी पॉझिटिव्ह आले आहेत. अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील नमुने निगेटिव्ह आहेत.
ज्या क्षेत्रात पॉझिटिव्ह नमुने आले आहेत असे क्षेत्र नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून प्राण्यांमधील संसर्गजन्य संक्रमण रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियम अंतर्गत आदेश लागू केले असून या भागांमध्ये कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तसंच या भागात निर्जंतुकीकरण देखील करण्यात आलं आहे.
राज्यात ज्या ठिकाणी अचानक कुक्कुट तसंच इतर पक्षी मृत अवस्थेत अचानक आढळल्यास संबंधित पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क करण्याचे आव्हान देखील राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. 18002330418 या संपर्क क्रमांकावर देखील संपर्क करण्याचं आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. पूर्ण शिजवलेले कुक्कुट पक्ष्यांचे मांस तसेच उकडलेली अंडी याचे सेवन पूर्णपणे सुरक्षित आहे... त्यात कोणतीही हानी नाही... नागरिकांनी अर्धवट शिजवलेले कुक्कुट पक्ष्याचे मांस अंडी याचे सेवन करू नये, असंही राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.