मुंबई, 02 एप्रिल : राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Maharashtra lockdown) होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray live) यांनी लाइव्ह येत माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आणखी एक संधी दिली आहे. लॉकडाऊन होणार की नाही हे पुन्हा नागरिकांवरच अवलंबून आहे. उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. पुढील एक-दोन दिवसांत निर्णय घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर केला जाईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय काय म्हणाले पाहुया.
1) गेल्या वर्षी मार्च महिन्यातच कोरोनाने राज्यात शिरकाव केला होता. मध्यंतरी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं होतं. मी जे सांगितलं ते नागरिकांनी ऐकून घेतलं आणि तसे वागलेही. पण मधल्या काळात आपण थोडे शिथील झालो, आपण शस्त्र टाकले की काय अशी परिस्थिती झाली.
2) मी सांगत होतो की परिस्थिती तशीच राहिली तर लॉकडाऊन करावं लागेल. ही शक्यता आजही टळलेली नाही
3) तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली. मार्चच्या आधीच कोरोनाच्या राक्षसाने अक्राळविक्राळ रुप धारण केलं. त्यातच आता कोरोनाचा नवा अवतार. कोरोना वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतो आहे, आपली परीक्षा पाहतो आहे
4) प्रयोगशाळा, चाचणी, बेड्सची संख्या वाढवली आहे. पण १५ दिवसांत आपल्याला सुविधा अपुऱ्या पडतील. सर्व सुविधा वाढल्या तरी डॉक्टर, नर्सेस आरोग्य कर्मचारी कसे वाढणार हा चिंतेचा विषय आहे.
हे वाचा - कल्याण-डोंबिवलीत नव्या रुग्णसंख्येचा उच्चांक; 24 तासांत हजारपेक्षा जास्त रुग्ण
5) देशात लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. लसीकरण, चाचण्या वाढवणं का उपाय मानायला मी तयार नाही, रुग्णवाढ कशी थांबवावी हे कोण सांगणार?
6) अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलेला आहे. काही देशांमध्ये हळूहळू लॉकडाऊन शिथील केले आहेत, लॉकडाऊन हा खूप घातक आहे, हे मला माहिती आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही, तर दुसरा उपाय काही असेल तर सांगा.
7) लॉकडाऊन नाही पण लॉकडाऊनचा इशारा. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. एक-दोन दिवसांत चर्चा करून निर्णय घेईन.
8) लॉकडाऊनविरोधात नाही तर लॉकडाऊन होऊ नये यासाठी कोरोनाविरोधात लढा, मदतीसाठी रस्त्यावर उतरा.
9) मास्क हा अनिवार्य आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना होतो, त्यामुळे मास्क लावायलाच हवा.
हे वाचा - पुणेकरांनो सावधान! संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडण्यास बंदी; पाहा काय आहेत नवे नियम
10) कोरोनाने आपल्यावर मात केली नाही, मी ती करूही देणार नाही. पण सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो आहे, जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. आम्ही जे करत आहोत ते जनतेच्या हितासाठी. त्यामुळे सर्वांनी एकत्र लढा देऊ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Uddhav thackarey