Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

काहीजण महिलांचं स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठमोठ्याने गाणी गातात. विकृतीचा कळस तर तेव्हा होतो जेव्हा काहीजण मुद्दाम अश्लिल चाळे करतात.

  • Share this:

मुंबई, २६ मार्च- मुंबईमध्ये ट्रेनला जेवढं महत्त्व आहे तेवढं महत्त्व महाराष्ट्रभरात कुठेच नाही. संपूर्ण मुंबईला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जोडण्याचं काम बस, रिक्षा, टॅक्सीही करते पण जेवढा प्रवास मुंबईकर ट्रेनमधून करतात त्याहून निम्मा प्रवासही या इतर माध्यमातून करत नसतील. लोकलवर अख्या मुंबईची भिस्त आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

प्रत्येक गोष्टीची जशी चांगली बाजू असते तशी एक काळी बाजूही असते. मुंबईची जान असणाऱ्या या लोकलमध्ये लोकलची लाज घालवणारी माणसंही असतात. मी रेणुका आज तुम्हाला माझा असाच एक वाईट अनुभव सांगणार आहे. माझी सेकण्ड शिफ्ट संपवून मी घरी ट्रेनने जात होते. नेहमीप्रमाणे मी मीडल लेडीज डब्यात बसले. या डब्याच्या पलीकडे अपंगांचा डबा असतो. रात्री १० नंतर त्या डब्यात फारसं कोणी चढत नाही. अगदी चढलंच तर व्यसनी आणि उद्दामपणा करणारेच चढतात. महिलांच्या डब्याला लागून अपंगांचा डबा असल्याने एका डब्यातलं दुसऱ्या डब्यात स्पष्ट दिसतं.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल: मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

याचाच फायदा घेऊन काहीजण महिलांचं स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठमोठ्याने गाणी गातात. विकृतीचा कळस तर तेव्हा होतो जेव्हा काहीजण मुद्दाम अश्लिल चाळे करतात. अनेकदा प्रसारमाध्यमांनी याबद्दल आवाज उठवला तर अनेकांनी अशांचे व्हिडिओ शूट करून व्हायरल केले. पण याचं प्रमाण तसूभरही कमी झालं नाही. मीही या गोष्टीची शिकार झाली आहे. माझ्या डब्यात तेव्हा आणखीन काही महिला होत्या. त्यांनी याविरोधात आवाज उठवला आणि त्या व्यक्तिला तातडीने ट्रेनमधून उतरायला लावले. मात्र ही घटना एकदा घडली आणि महिलांनी त्याला चांगलाच दम भरला म्हणून ती व्यक्ती दुसऱ्यांदा तसं काही करणार नाही याची ग्वाही कोणालाच देता येणार नाही.

जोवर सरकार या सर्व गोष्टींवर कठोर कायदा करत नाही तोवर असे विकृत चाळे करणाऱ्यांवर आळा बसणार नाही. आतापर्यंत अनेकदा एक्स्प्रेस ट्रेन आणि लोकल ट्रेनमध्ये महिलांसमोर हस्तमैथुन करण्याचे प्रकार उघडकीला आले. पण यावर लक्षात राहील अशी कोणतीच कठोर कार्यवाई झाली नाही. या सर्व प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा लोकांवर पोलीस काय कारवाई करतात हा प्रश्नही अनेकदा विचारला जातो आहे. पण याचं उत्तर अजूनही प्रवाशांना मिळालं नाही.

- मधुरा नेरुरकर

First published: March 26, 2019, 6:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या