वाशी, 25 मार्च : हल्ली प्रत्येकजण ट्रेनमध्ये होणाऱ्या दादागिरीबद्दल आणि स्टंटबाजीबद्दल बोलतं. यावर प्रत्येकाचे काही ना काही विचार असतात. पण मी नमिता अशी एक मुलगी असेन जिचा या गोष्टींवर बोलायचा काही हक्क नाही. असं का तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी राहते वाशीला… तिकडून दररोज मी कुर्ल्याला कॉलेजला ट्रेनने यायचे. कॉलेजच्या मित्र मैत्रिणींसोबत ट्रेनमधून मजा मस्ती करत येण्यात आमचे कित्येक दिवस आणि महिने गेले. ट्रेनमध्ये उभं राहून जोरजोरात बोलणं, एखादी बाई शांत बसलेली पाहून तिला त्रास देणं, एवढंच काय तर झोपलेल्या व्यक्तीच्या जवळ जाऊन जोरात ओरडणं यातच आम्हाला जिवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. अजूनही मला तो दिवस चांगलाच आठवतो. मी आणि माझी मैत्रीण ट्रेनमधून प्रवास करत होतो. नेहमीप्रमाणे दरवाज्यावर उभं राहून स्टंटबाजी सुरू होती. समोरून एखादी ट्रेन येतेय असं दिसलं की एका हाताने ट्रेनच्या दरवाज्याचा खांब पकडायचा आणि संपूर्ण शरीर बाहेर झोकून द्यायचं हा आमचा आवडता खेळ होता. असं करताना मला एका ८० च्या आसपास असणाऱ्या आजींनी पाहिलं. त्यांनी मला असं करू नको सांगितलं. पण, कॉलेजला जाणारं तरुण रक्त होतं. कोणाचं ऐकणं हा अपमानच वाटायचा. -—————————————————————————————————————————————————————— Life In लोकल: मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज… कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. -—————————————————————————————————————————————————————— मी त्यांना तेवढ्याच उद्धटपणे बोलले, ‘मला दारावर उभं राहायची सवय आहे. तुमचं काय जातंय. तुम्ही तुमचं पाहा ना. माझे स्टंट पाहायचेत का?’ असं म्हणत मी त्यांना जाणूनबूजून स्टंट दाखवायला लागले. तेव्हा समोरून एक स्लो ट्रेन आली आणि तिच्या हवेच्या धक्याने मी ट्रेनमधून पडले. त्या आजीला दोन्ही हात सोडून स्टंट कसा करतात हे दाखवणेयासाठी गेले आणि स्वत:चा जीव धोक्यात घातला. १५ दिवस माझ्यावर उपचार झाले. हात पाय फ्रॅक्चर झाले, डोक्याला टाके बसले एवढंच काय तर पायात सळीही बसवावी लागली. तो दिवस आणि आजचा दिवस मी कधीच दारात उभीही राहिले नाही. आता जेव्हा जेव्हा माझ्यासमोर तरूण मुलं मुली स्टंट करतात तेव्हा मला माझे दिवस आठवतात पण मी इच्छा असूनही त्यांना काही सांगत नाही. कारण मला माहितीये त्याचा फारसा काही परिणाम होणार नाही.. - मधुरा नेरुरकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







