कल्याण, 23 मार्च : सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरस (coronavirus) या संकटाशी दोन हात करत आहे. या विषाणूने 13 हजाराहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. भारतातही दिवसेंदिवस याचा धोका वाढत आहे. यामुळेच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. या अंतर्गत लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र लोकांनी याकडे दुर्लक्ष केले आणि ते घराबाहेर गेले. मुंबईतही असेच एक प्रकरण समोर आले आहे.
एकीकडे कोरोनाव्हायरसमुळे क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दुसर्या महायुद्धानंतर प्रथमच क्रिकेटच सामने रद्द केले आहेत. तर, कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेता रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर बहुतेक लोकांनी घरीच राहण्याचा निर्णय घेतला. परंतु महाराष्ट्राच्या कल्याणामध्ये काही लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, याचा फटका त्यांना बसला.
जनता कर्फ्यू असताना खेळायला गेले क्रिकेट
कल्याणमध्ये जनता कर्फ्यू दरम्यान क्रिकेट खेळणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण कर्फ्यू दरम्यान क्रिकेट खेळत होते. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. या सर्वांविरूद्ध महात्मा फुले चौक पोलिस स्थानकात भादंवि कलम 188, 269 आणि 290 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि 2005 मधील राष्ट्रीय आपत्ती अधिनियमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आजपासून लॉक डाऊन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (22 मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषेदत कोरोनला रोखण्यासाठी राज्यात कलम 144 आजपासून लागू होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सध्या 31 मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन असणार आहे अशी घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona