मुंबई-पुण्यातून गावी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा

मुंबई-पुण्यातून गावी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा

शहरातून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. राज्य सरकारकडून आता याबाबत महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 मे : राज्यातील मुंबई-पुणे-ठाणे यांसारख्या शहरांमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा अशा शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. राज्य सरकारकडून आता याबाबत महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.

1. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर ) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांना आहेत.

2. असे असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.

3. मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याच्या परवानगी आहे.

4. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-19 प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

कृपया अर्धवट किंवा अनाधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये, अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

मजुरांबाबत मुंबईचे पालकमंत्री काय म्हणाले?

'कामगारांना बाहेरच्या राज्यात जाण्यासाठी वैद्यकीय दाखला द्यावा लागणार आहे. त्यामुळे बस डेपो, रेल्वे स्टेशन तसंच ओपन जागा येथे डॉक्टरांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याचा विचार आहे. कारण भविष्यात हे कामगार एका ठिकाणी जमण्याने वेगळी समस्या होता कामा नये. परप्रांतीय कामगारांकडे महाराष्ट्रातील आधारकार्ड नसावे. जे कामगार रोजगारासाठी मुंबईत आले आहेत, फक्त त्यांनी आपले नाव नोंदवावे,' असं कॅबिनेट मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 2, 2020, 3:44 PM IST

ताज्या बातम्या