मुंबई, 11 जुलै : गेल्या काही वर्षांत इंटरनेटचा (Internet) वापर खूप वाढलाय. इंटरनेटमुळे आपली अनेक कामं सोपी झाली आहेत. अगदी शॉपिंगपासून (Shopping) ते लाईट बिल भरण्यापर्यंत सगळी कामं ऑनलाइन (Online) होतात. हल्ली बरीच शॉपिंग आणि पेमेंट अॅप्स आपण शॉपिंग किंवा पेमेंट पूर्ण केल्यावर वेगवेगळ्या ऑफर्सचे व्हाउचर देत असतात. त्याशिवाय एका विशिष्ट लिंकवर क्लिक करून तुम्ही आयफोन (iPhone), लॅपटॉप (Laptop) किंवा महागडा टीव्ही जिंकू शकता, अशा ऑफर दिल्या असतात. त्यासाठी तुम्हाला ती लिंक तुमच्या 11 किंवा त्यापेक्षा कमी अधिक मित्रांना व्हॉट्सअॅपवर पाठवायची असते. पण अशा लिंक क्लिक करण्याआधी सावधान, कारण अशा लिंकमुळे तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो. tinyurl5.ru ही लिंक तुम्हाला देखील कधीतरी नक्कीच आली असेल. बरेच जण त्यावर क्लिकदेखील करतात. या लिंकवर शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या अमेझॉन कंपनीचा लोगो असतो आणि त्यावर giveaway लिहिलेलं असतं. तसंच त्याच्या टायटलमध्ये Amazon Returned Products Giveaway आणि सबटायटलमध्ये 10000 Free products for you. असं लिहिलेलं असतं. तुम्ही या लिंकवर क्लिक करतात तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितलं जातं. तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर 6 गिफ्ट बॉक्स दिसतात, त्यापैकी 2 बॉक्सवर तुम्हाला क्लिक करावं लागतं. तुम्ही पहिल्या बॉक्सवर क्लिक केल्यास तो खाली निघेल आणि दुसऱ्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही iPhone जिंकला आहे, असा मेसेज येईल. पण त्यासाठी तुम्हाला तो मेसेज 5 व्हॉट्सअॅप ग्रुप आणि 20 लोकांना पाठवायचा असतो. त्यानंतर डिलिव्हरी अॅड्रेस सबमिट करून रजिस्ट्रेशन कम्प्लीट करावं लागते. citynewsgiridih.comने tinyurl5.ru या लिंकची पडताळणी केली. तेव्हा त्यावर Warning Suspected Phishing Site ahead असं लिहिलं होतं. अशा अनेक URL तुम्हाला एका लिंकद्वारे दुसऱ्या लिंकवर घेऊन जातात, एकतर तिथे जाहिराती दाखवतील किंवा डेटा गोळा करण्यासाठी फॉर्म सबमिट करण्यास सांगतील. tinyurl5.ru ही URL शॉर्टनिंग सेवा पुरवते. याचा वापर जाहिराती दाखवण्यासाठी आणि तुमची वैयक्तिक माहिती (Personal Information) मिळवण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून केला जातो. अशा लिंक्समुळे तुम्हाला त्रास तर होतोच; पण तुमचा मोबाईल आणि कॉम्प्युटर हॅक होण्याचा धोका उद्भवू शकतो. असे मेसेज आल्यास काय करायचं? - सर्वांत आधी मेसेज पाठवणाऱ्याशी बोलून मेसेजच्या सत्यतेबद्दल पडताळणी करा. - मेसेज डिलीट करा. - तुम्ही दुसऱ्या कुणालाही हा मेसेज फॉरवर्ड केला असेल तर त्यांनाही मेसेज डिलीट करण्यास सांगा. - हा मेसेज मिळाल्यानंतर फोनचं सेटिंग चेक करा. त्यात कोणताही अनवाँटेड प्रोग्रॅम आलाय की नाही, ते बघा. आला असेल तर तो डिलीट करा. - वेब ब्राउझरच्या सेटिंगमध्ये हिस्ट्री, कॅशेज, कुकीज डिलीट करा. - सोशल मीडियावर (Social Media) कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची पडताळणी करा. अनोळखी लोकांकडून आलेले कोणतेही मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नका. हल्ली सायबर फ्रॉडचं प्रमाण खूप वाढतंय. त्यामुळे फोनवर अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज आणि त्यात दिलेल्या लिंक्सवर क्लिक करणं टाळा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.