मुंबई, 14 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री (Gujarat CM) बदलानंतर शिवसेनेने (Shiv Sena) भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे मॉडेल असल्याचे आदळआपट करत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करुन नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल (Gujarat Model) म्हणाचयचे ते हेच काय? असा सवाल सामानातून (Saamana) विचारण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'विषयी नेहमीच उत्सुकता असते. ज्या विषयांची कोणालाही कल्पना नसते असे अनेक विषय धुंडाळून मोदी 'मन की बात' व्यक्त करीत असतात. अगदी खेळण्यांपासून ते पाळण्यांपर्यंत, पण त्यांच्या मनात काय चालले आहे याचा शोध घेणे कठीण आहे, हे गुजरातच्या मुख्यमंत्री निवडीवरुन स्पष्ट दिसले असंही सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
महिलांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक संपली, गृहमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा
मोदी राजकारणाचे तंत्र
धक्का देणे व फार झोतात नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता देणे हेच मोदी राजकारणाचे तंत्र आहे. गुजरातमध्ये तेच घडले. मोदी यांनी अनेकदा अचानक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. महाराष्ट्रतही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देऊन धक्का दिला होता. आता गुजरातमध्येही त्याच धक्कातंत्राचा वापर झाला आहे असंही सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
लोकशाहीचे, राज्यकारभाराचे व विकासाचे गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसे टपकन फुटले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते. तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? याच पद्धतीने उत्तराखंड, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही काही दिवसांपूर्वी बदलण्यात आले. मध्यप्रदेशातही बदल केले जातील असे संकेत आहेत. फक्त मुख्यमंत्री नाही तर ज्या राज्यांत भाजपची सरकारने नाहीत तेथेही नेतृत्वबदल होतील असे प्रसिद्ध झाले आहे असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.