मुंबई, 11 डिसेंबर : सध्याच्या काळात आधुनिक शस्त्रांचा वापर वाढला असला तरी जगभरात भारतीय प्राचीन युद्ध कलेचं महत्त्व सर्वश्रुत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेल्या शिवकालीन कला आणि शस्त्रविद्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र, आधुनिक काळात जगभरात नावाजलेली भारतीय प्राचीन युद्ध कला ही काळाच्या ओघात लोप पावत चालली आहे. भारताच्या या प्राचीन युद्ध कलेला जिवंत ठेवत तसेच स्व - संरक्षणासाठी तिचा वसा जपण्याचे काम मुंबई तील कुर्ल्यातील सुनील बबन सोनवणे आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक सोनवणे करत आहेत. या कलेचं दिलं जातं मोफत प्रशिक्षण शिवकालीन शस्त्रकला ही नामांकित शस्त्रकला आहे. शिवकाळात शस्त्रांना अनन्यसाधारण महत्त्व होते. तलवारबाजी, दांडपट्टा चालविणे, ढाल, कट्यारी, कुकरी, वाघनखे, धनुष्यबाण, भाले इत्यादी शस्त्रांना महत्व होते व या शस्त्राने युद्ध केली जात असतं. काही दशकांपूर्वी मर्दानी खेळाच्या रूपाने ही कला पाहायला मिळत होती. मात्र, अलीकडे याकडे दुर्लक्ष होत होते ही बाब लक्षात घेऊन कुर्ल्यातील सुनील सोनवणे यांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. या वर्गात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी इत्यादीचे मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे. यात 6 ते 40 वयोगटातील महिला, पुरुष सहभाग घेऊ शकतात. दररोज सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण कुर्ल्यातील मॅच फॅक्टरी मैदान येथे सुरू असते.
खरा मावळा! 27 वर्षांपासून एक पैसा न घेता महाराजांची सेवा करणारे मेहबूब हुसेन, Video
प्रशिक्षणादरम्यान येथे युद्धकला, तसेच एखादे शस्त्र शिकवण्याआधी प्रशिक्षकांकडून त्या मागील इतिहास, शस्त्र वापरायचे तंत्र, ते कोणत्या धातूंनी बनवले जाते, इत्यादी शस्त्रांसंबंधी संपूर्ण माहिती दिली जाते. प्रशिक्षणात सर्वप्रथम सर्व शस्त्रांचे मूळ असणाऱ्या काठीचे प्रशिक्षण दिले जाते. काठी मध्ये पारंगत झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना धार नसलेली तलवार, दांडपट्टा, काठी बंदीश, रुमाल बंदिश इत्यादी शस्त्र आणि युद्ध कलेतील प्रकार शिकवले जातात. महिलांनी स्वतःच संरक्षण करण्यासाठी शस्त्रकला शिकणे गरजेचे सध्या महिलांवर होत असलेल्या अत्याचार पाहता महिलांनी स्वतःच संरक्षण करण्याची गरज आहे. यासाठी महिलांना शिवकालीन शस्त्रकला, मैदानी खेळ शिकणे आवश्यक आहे. अशा प्रशिक्षणामुळे महिला व मुलींच्या छेडछाडीला निश्चित आळा बसेल असं मत अभिषेक सोनवणे याने व्यक्त केले.
स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी… शिवाजी महाराजांबाबत तरुणानं रक्तानं लिहिलं राष्ट्रपतींना पत्र
शस्त्र कला शिकल्याने कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर संयम राखण्यासाठी देखील त्याचा फायदा होतो. शस्त्र शिकल्यामुळे आपल्यातील ताकदीविषयी जाण येऊन ती कुठे आणि कशाप्रकारे वापरायची हे समजायला मदत होते. तसेच प्राचीन युद्ध कलेत पारंगत झाल्यामुळे आत्मविश्वास वाढवून यामुळे महिला सशक्तीकरणालाही बळ मिळते, असं प्रशिक्षक सुनील सोनवणे सांगतात.
पूर्ण पत्ता 3V8G+V8Q, कुर्ला पश्चिम, कुर्ला, मुंबई, महाराष्ट्र संपर्क क्रमांक - 998729008