Home /News /mumbai /

कोरोना काळात मेट्रोमोनियल साइट्सवर मुलींची मोठी फसवणूक, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

कोरोना काळात मेट्रोमोनियल साइट्सवर मुलींची मोठी फसवणूक, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

परदेशातही मोठ्या पगाराची नोकरी असलेल्या NRI नवरा पाहिजे, या इच्छेपायी अनेक मुलींनी आपली फसवणूक करुन घेतल्याच्या घटनांची संख्या यात जास्त आहे.

मुंबई, 20 डिसेंबर : मेट्रोमोनियल म्हणजेच विवाह स्थळांच्या वेबसाईटवर वधूच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना काळात तर मेट्रोमोनियल साईटवरील मुलींच्या फसवणुकीच्या प्रकारांनी उच्चांक गाठला आहे. कोव्हिड काळातच दरवर्षी पेक्षा 30 ते 50  टक्क्यांनी जास्त मेट्रोमोनियल साईटसवर रेकॉर्ड ब्रेक विवाह नोंदणी झाली आहे. परदेशातही मोठ्या पगाराची नोकरी असलेल्या NRI नवरा पाहिजे, या इच्छेपायी अनेक मुलींनी आपली फसवणूक करुन घेतल्याच्या घटनांची संख्या यात जास्त आहे. सद्यपरिस्थितीत पैशांच्या मागे पळताना नातीगोत्यांचा सर्वांना विसर पडला आहे. यामुळेच जेव्हा लग्न जुळवण्याची वेळ येते तेव्हा विवाह स्थळ नोंदणीची मदत घ्यावी लागते आणि इथेच अनेकांची फसवणूक होते. अनोखळी व्यक्तीशी विवाह करताना समोरची व्यक्ती मुळात कशी आहे हे शेवटपर्यंत कळत नाही आणि अशा नात्यांचा शेवट फसवणुकीत होण्याची शक्यता अधिक असते. मुंबईत राहणाऱ्या अशा एका मुलीची मेट्रोमोनियल साईट्सवरुन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीने सांगितलं की, 'मी एका मल्टी नॅशनल कंपनीत सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते. 3 महिन्यांपूर्वी UK हून भारतात परतल्यावर मी माझं नाव एका प्रसिद्ध मेट्रोमोनियल साईटवर नोंदवलं. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत राहणाऱ्या पण UN साठी काम म्हणून सध्या इस्राईलमध्ये असलेल्या मोहित शिंदे नामक मनुष्याचा इंटरेस्ट आला. वरकरणी प्रोफाईल चांगला असल्याने मी इंटरेस्ट स्वीकारला आणि मेल्स शेअर केले. पहिल्याच इमेलमध्ये खूप जास्त रोमँटिकली बोलणं, आपण इस्राइलमध्ये असल्याचे वारंवार ठासून सांगत राहणे. परदेशातील ॲाफिसचा संपूर्ण पत्ता युएसच्या घरातील संपूर्ण पत्ता असे खुप डिटेल्स न विचारता सतत पुरवत राहणं. अशा गोष्टींमुळे मला शंका येवू लागली होती,' असं या तरुणीने सांगितलं. याबाबत अधिक माहिती देताना ही तरुणी म्हणाली की, 'मी दोन दिवसातच नकार कळवला.  त्यानंतर त्याने परत दोन आठवड्यांनी मला मेल करुन मदतीची याचना केली. तो कोव्हिडमुळे इस्राईलमध्ये अडकला असून त्याला सॅलरीचे पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत. तू बराच काळ परदेशात राहिलेली आहेस त्यामुळे तुझ्याकडे मनी ट्रान्सफर सर्व्हिस असेलच. त्यामुळे तू मला हे पैसे ट्रान्सफर करायला मदत करशील का असे त्याने विचारले. ते मला 3 लाख 80 हजार युएस डॉलर म्हणजेच 2 कोटी 80 हजार भारतीय पैसे ट्रान्सफर करणार होता. त्यातले काही पैसे मी त्याला मदत म्हणून दिले आणि गिफ्ट ठेवून उरलेले पैसे त्याच्या युएस अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करायचे होते. मी त्याला स्पष्ट नकार देवून लगेच त्याचे प्रोफाईल ब्लॉक करुन लगेच रिपोर्ट केलं. मी नकार देवूनही त्याने आता आपले लग्न तर होणारच आहे अशी वाक्य वापरली होती. या प्रकरणात त्याने कधीच माझ्याकडे पैसे मागितले नव्हते पण हे काम करुन मी एका मनी लॉन्ड्रिंगच्या कारस्थानचा भाग झाले असते हे ऐकून आता जीवाचा थरकाप उडला होता,' असं सदर तरुणी सांगितले. दरम्यान, फसवणुकीचे असे प्रकार टाळण्यासाठी मेट्रोमोनियल साईट्सचा वापर करणाऱ्या तरुण-तरुणींनी अधिक खबरदारी बाळगण्याची गरज या प्रकरणातून अधोरेखित झाली आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Mumbai, Mumbai police

पुढील बातम्या