मुंबई, 16 डिसेंबर : राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं म्हटलं जातं. एकेकाळी कट्टर मित्र असलेले भाजप-शिवसेना सध्या कट्टर विरोधक झाले आहे. भाजपमधील कोणत्या नेत्याने शिवसेनेवर सर्वाधिक टीका केली असेल असं विचारलं तर कोणाच्याही जिभेवर किरीट सोमय्या यांचं नाव येईल. दुसरीकडे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही अनेकदा सोमय्या यांना जशास तसे उत्तर दिलं आहे. मात्र, हे राजकीय कट्टर विरोधक जेव्हा प्रत्यक्षात भेटतात, तेव्हा काय होतं? याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला. जेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर समोरासमोर आले. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
Video : एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते किरीट सोमया आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर समोरासमोर#mumbai @ShivSena @BJP4Maharashtra pic.twitter.com/3bWCOp5tha
— News18Lokmat (@News18lokmat) December 16, 2022
सोमय्या आणि पेडणेकरांची भेट
एरवी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आज एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. या लग्न सोहळ्यात भाजप नेते किरीट सोमय्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची समोरासमोर भेट झाली. किरीट सोमय्या आणि पेडणेकर यांनी एकमेकांना हसतमुखाने नमस्कार केला. निल सोमय्या किशोरी पेडणेकर यांच्या पाया पडले. यावेळी पेडणेकर यांनी निलची चौकशी केली. त्यानंतर सोमय्या आसनस्थ झाले. या प्रसंगाचा व्हिडीओ समोर आला असून राजकारण कोणी कोणाचा शत्रू नसतो हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पेडणेकरांवर सोमय्याचे भ्रष्टाचाराचे आरोप
किरीट सोमय्या यांनी SRA घोटाळ्या संदर्भात किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फोर्जरी, बनावटी करार, फसवणूकसाठी आयपीसी आयपीसी 420 अंतर्गत गुन्हा एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. घोटाळ्याचे पुरावे उद्धव ठाकरेंकडे देण्यात आले होते पण त्यांनी याची दखल न घेता हे प्रकरण दाबून ठेवल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि किशोरी पेडणेकरांमध्ये एवढी हिंमत नाही की ते मी दिलेले पुरावे खोटे असल्याचे सिद्ध करू शकतील असंही सोमय्या म्हणाले.
दबावतंत्राचा वापर सुरु : किशोरी पेडणेकर
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी मागच्या महिन्यात चौकशी केली होती. तसेच पुन्हा चौकशीला बोलावलं होतं. मात्र, आपण चौकशीसाठी जाणार नाही असं पेडणेकर यांनी सांगितलं. किरीट सोमय्या हे संजय राऊतांनंतर मला टार्गेट करत आहेत असं पेडणेकर म्हणाल्या. त्यामुळे आजच्या भेटीनंतर तरी हे प्रकरण मिटणार का? असा प्रश्न उपस्थितांना पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kirit Somaiya, Kishori pedanekar