कोरोना काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव, त्यामुळे होणारा त्रास अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फटाके विक्री आणि फटाके वाजवण्यावरही बंदी आणली आहे.
राज्यात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून (NGT) पुण्यासह 17 शहरात फटाक्यांवर बंदीचा आदेश देण्यात आला आहे. सोमवारी या याचिकेवर न्या. आदर्शकुमार गोयल यांनी निकाल दिला आहे.
येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवरील बंदी कायम असणार आहे. फटाके विकल्यास 20 हजार रुपये दंड, तर फटाके वाजवल्यास 2000 रुपये दंड आकारण्यात येण्याचा आदेश देण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील अनेक शहरांत हवेचा दर्जा अतिशय खालावल्याची माहिती आहे. त्यापैकी अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर ही 17 प्रदूषित शहरं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेने मुंबईत फटाक्यांबाबत काही नियम जाहीर केले आहेत. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, मैदान यांच्या आवारात फटाके फोडण्यास बंदी आहे.
केवळ घराच्या, इमारतीच्या आवारात फक्त 14 नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सौम्य स्वरूपाचे फटाके फोडता येणार आहेत.