विजय वंजारा, मुंबई, ०7 जून : आजकाल छोट्यातल्या छोट्या कारणामुळे तरुण मुले मुली टोकांचं पाऊल उचलताना दिसतात. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून एका मुलीने छोट्याश्या गोष्टीवर स्वतःच्या हाताच्या नसा कापून घेतल्या. हे प्रकरण नेमकं काय आणि कुठे घडलं याविषयी जाणून घेऊया. खार येथील एका धर्मशाळेतील 16 वर्षांच्या मुलीने मोबाइलवरून झालेल्या भांडणातून स्वतःच्या हाताच्या नसा कापून घेतल्या. सात ते आठ ठिकाणी ब्लेडने नस कापण्यात आल्याने प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. परिणामी मुलगी तिथेच बेशुद्ध पडली. याचवेळी तिथे पोहोचलेल्या खार पोलिसांच्या निर्भया पथकातील महिला पोलीस कॉन्स्टेबल निकिता म्हात्रे यांनी या मुलीला तातडीने उचलून खाली आणले आणि पोलिसांच्या वाहनातून भाभा रुग्णालयात नेले. पोलिसांच्या तप्तरतेमुळे वेळीच योग्य उपचार मिळाल्याने या मुलीला जीवदान मिळाले.
सेठ इदरसल वरदमल धर्मशाळेतील एका 16 वर्षीय मुलीचा तिच्या भावासोबत मोबाइलवरून वाद झाला. त्याचा राग मनात धरून या मुलीने स्वतःच्या हाताच्या नसा ब्लेडने कापल्या. साठ ते आठ वेळा अनेक ठिकाणी ब्लेडने कापण्यात आल्याने तिच्या हातामधून खूप रक्तस्राव होऊ लागला. धर्मशाळेतून कुणीतरी ही घटना खार पोलीस ठाण्यात फोनद्वारे कळवली. खार पोलीस ठाण्याचे पीटर ऑपरेटर इंदुलकर यांनी घेऊन ही माहिती निर्भया पथकाला दिली. निर्भया पथकातील महिला कॉन्स्टेबल म्हात्रे यांच्यासह चंद्रकांत तेरवणकर, माधुरी मजवेलकर आणि विशाल घार्गे हे घटनास्थळी पोहोचले. बरेच रक्त वाया गेल्यामुळे मुलगी बेशुद्ध पडली होती. म्हात्रे यांनी तिला हातावर उचलून घेतले आणि पहिल्या मजल्यावरून खाली आणले. तेथून जवळपास 100 मीटरपर्यंत उचलून नेत पोलिसांच्या वाहनात ठेवले. क्षणाचाही विलंब न करता पोलीस वाहनातून या मुलीला भाभा रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी मुलीवर तत्काळ उपचार सुरू करून प्रथम रक्तस्राव थांबवला. वेळीच उपचार मिळाल्याने आणि रक्तस्राव थांबल्याने मुलीला शुद्ध आली. पोलिसांच्या तत्परतेमुळे या मुलीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. खार पोलिसांच्या विशेषतः म्हात्रे यांनी केलेल्या कामगिरीचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. दरम्यान, म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी अशीच एका महिलेचीही मदत केली होती. पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी प्रशस्तीपत्रक देऊन खार निर्भया पथकाचा गौरव केला.