मुंबई, 4 जानेवारी: कोरोना विषाणूमुळे (Covid-19) जगभर पसरलेली साथ आटोक्यात येते आहे असं वाटत असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या अवतारामुळे (New strain of coronavirus in UK) दहशत पसरली. भारतातही त्याची लक्षणं काही प्रवाशांमध्ये दिसली, पण महाराष्ट्र अद्याप त्यापासून दूर होता. पण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ब्रिटनमधून राज्यात आलेल्या 8 प्रवाशांमध्ये ही नव्या विषाणूची लक्षणं दिसली आहेत.
ब्रिटनमधून आलेल्या सर्व प्रवाशांची कोविड चाचणी होत आहे. त्यात पॉझिटिव्ह आलेल्यांची जिनोम सिक्वेन्सिंगही केलं जातं. अशा विशेष चाचण्यांमधून आता राज्यातल्या 8 जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राजेश टोपे यांनी ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार, या सर्व रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि आता ते ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
पुन्हा मुंबई, ठाणे आणि पुण्यात धोका
कोरोनाच्या साथीत देशात सर्वाधिक मृत्यू मुंबईने पाहिले आणि सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे जिल्ह्यात आहे. आताही नव्या विषाणूचे पहिले रुग्ण याच दोन शहरांमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या भीतीच्या विळख्यात तर ही शहरं जाणार नाहीत ना, अशी शंका निर्माण झाली आहे. नव्या विषाणूची लक्षणं दिसलेल्या 8 पैकी 5 मुंबईत आहेत, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मध्ये प्रत्येकी एकेक जण आहे.
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 4, 2021
नवीन स्ट्रेनचा सर्वाधिक धोका तरुणांना
ब्रिटन (Britain) व्यतिरिक्त हा विषाणू (Corona Virus)आता जगातील इतरही देशांत पसरला आहे. या विषाणूबाबत शास्त्रज्ञांनी (Scientist) आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा नवीन कोरोना विषाणू तरुणांमध्ये झपाट्याने पसरत आहे. इम्पीरियल कॉलेज लंडनने केलेल्या संशोधनातून (Research) असं दिसून आलं आहे. कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (Corona virus new strain) 20 वर्षांखालील तरुणांमध्ये (Young man) झपाट्यानं पसरत असल्याचंही या संशोधनात म्हटलं आहे.
नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य
ब्रिटनमध्ये (UK) SARS-CoV-2 चा जो नवा स्ट्रेन दिसून आला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे. पण कोरोनाव्हायरसमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे असं नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं. पण नव्या विषाणूमुळे नेमका काय परिणाम होतो हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus