नवी मुंबई, 24 जून : नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) कुणाचं नाव द्यायचं यावरून सुरू असलेला वाद अधिकच चिघळत चालला आहे. या विमानतळाला भूमीपुत्रांचे नेते दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचंच नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी गुरुवारी हजारो स्थानिक रस्त्यावर उतरले (Thousands gathered on road) आणि नवी मुंबईतील बेलापूरमध्ये जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनासाठी तोबा गर्दी जमली होती. या परिसरात ड्रोनने टिपलेल्या दृष्यांमधून (Drone Shots) या अलोट गर्दीची कल्पना येऊ शकते.
एकीकडे कोरोनामुळे राज्यात लावण्यात आलेले निर्बंध आता कुठे शिथिल व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र नवी मुंबईत या आंदोलनासाठी जमलेली गर्दी पाहता, कोरोना गेला की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. बेलापूरमधील नवी मुंबई पालिका कार्यालयाच्या परिसरात अक्षरशः नजर जाईल तिथपर्यंत माणसंच माणसं दिसत होती. भूमिपुत्रांचे नेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी स्थानिक जनता किती आक्रमक आहे, हेदेखील या आंदोलनातून दिसून आलं.
अबब! केवढी ती गर्दी... कुठे गेला कोरोना? नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून आंदोलन झालं, त्याचं ड्रोनच्या साहाय्याने टिपलेलं चित्र#NaviMumbaiAirport #NaviMumbaiAirportNameRow pic.twitter.com/KvoYY7eKVZ
— News18Lokmat (@News18lokmat) June 24, 2021
काय आहे वाद?
नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी विमानतळासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांची आहे. दि. बा. पाटील यांनी त्यांच्या हयातीत स्थानिकांना त्यांचे हक्क आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आंदोलनं केली. स्थानिक आमदार, खासदार असा प्रवास करत त्यांनी आयुष्यातील अखेरची वर्षं ही भूमिपुत्रांच्या आंदोलनासाठी खर्च केली. त्यामुळे नवी मुंबईत होणाऱ्या विमानतळाला त्यांचंच नाव देण्यात यावं, या मागणीसाठी स्थानिक आक्रमक आहेत. भाजपनंही स्थानिकांच्या या मागणीला पाठिंबा देत दि. बा. पाटील यांचंच नाव विमानतळाला देण्याची भूमिका घेतलीय.
हे वाचा - Unlock करण्याची घाई नको! या 7 जिल्ह्यांमुळे मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला Alert
शिवसेनेनं मात्र या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं, अशी भूमिका घेतली आहे. मुंबईतील विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असल्यामुळे या विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचं नाव देणं योग्य राहिल, असं शिवसेनेचं म्हणणं आहे.
पुढे काय होणार?
वास्तविक, विमानतळाला कुणाचं नाव द्यायचं, हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे. या नावासाठी राज्य सरकार प्रस्ताव पाठवू शकतं. मात्र तो स्विकारायचा की नाही, याचा फैसला केंद्र सरकारच्या हाती आहे. त्यात आता भाजपनं दि. बा. पाटील यांच्या नावाला समर्थन दिल्यामुळे अंतिम निर्णय काय होतो, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.