युरोपमधील आयर्लंड देशापासून भारतातील मुंबई आणि त्यानंतर धुळ्यापर्यंत केलेल्या प्रयत्नामुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे. या तरुणाचा आत्महत्येचा फेसबुक लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याचा विचार होता.
आयर्लंडमध्ये फेसबुकच्या मुख्यालयाने मुंबई पोलिसांना याबाबत सूचना दिली होती. 23 वर्षीय ज्ञानेश्वर पाटील आत्महत्येचा प्रयत्न करणार होता आणि सोबतच फेसबुकवर लाइव्ह स्ट्रिमिंग करीत आहे. ही सूचना मिळताच मिनिटांत पोलिसांची टीम पाटील याच्या घरी पोहोचली आणि त्याला वाचवलं. पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
रविवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबई सायबर पोलिसांच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांना आयर्लंडमधील फेसबुक मुख्यालयातून फोन आला की, एक तरुण आत्महत्या करीत आहे आणि तो फेसबुकवर लाइव्ह स्ट्रिमिंग करीत आहे. फेसबुक मुख्यालयाने यासंदर्भातील स्क्रीनशॉट्स शेअर केले. पाटील रडत होता आणि त्याच्या गळ्यावर वस्तरा होता.
मुंबईच्या सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आणि त्या युवकाच्या ठिकाणाचा शोध सुरू केला. संपूर्ण सायबर पथकाने पाटील यांच्याविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. 20 मिनिटांत टीमला पाटील यांचे पिन-पॉइंट लोकेशन मिळाले.
डीसीपी रश्मी करंदीकर म्हणाल्या की, पिन पॉइंट लोकेशन हे खूप महत्वाचे आणि कठीण काम होते. आम्हाला लोकेशन अवघ्या 10 मिनिटात मिळाले. आमच्याकडे धुळ्याच्या इमारतीचे नाव आणि त्या तरुणाचे नाव होते. आम्ही तातडीने रात्री 8.30 वाजता धुळ्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
धुळे अधिकारी रात्री 9 वाजता पाटील यांच्या घरी पोहोचले आणि त्यांची सुटका केली. त्यावेळी पाटील यांच्या गळ्यातून रक्त येत होतं. त्यांना तातडीने वाचविण्यात आले व रुग्णालयात नेण्यात आले.
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पाटील याने आपला गळा रेजरने कापण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे होते. फेसबुकजवळ अशा केसेसवर काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट टीम आहे. त्यांनी याबाबत कळताच तातडीने मुंबई पोलिसांना सूचना दिली.