मुंबई 17 नोव्हेंबर: दिवाळीचा सण आणि उघडलेली मंदिरं यामुळे राज्यातले सर्व व्यवहार आता सुरळीत झाले आहेत. त्यामुळे गर्दीही वाढलेली आहे. असं असतांना राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. ही घट सलग महिनाभरापेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. मंगळवारी (17 नोव्हेंबर) राज्यात 5 हजार 123 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 23 हजार 503 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 2 हजार 840 नव्या रुग्णांची भर पडली. राज्याचा Recovery Rate 92.64 टक्के एवढा झाला आहे.
राज्यात 68 रुग्णांचा मृत्यू झाला. तर मृत्यूदर हा 2.63 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 81 हजार 925 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
देशात कोरोनाचा (Coronavirus) आलेख घसरणीला आला आहे. सलग गेल्या 45 दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्याने केलेले एकत्रित प्रयत्न, चाचण्यांची वाढवलेली संख्या आणि इतर उपाय योजनांमुळे आलेख घसरणीला लागल्याचंही ते म्हणाले. असं असलं तरी देशात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरीकांनी सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलं.
ज्यांना कोरोनाची लक्षणं आढळून आलीत त्यांनी लगेच कोविड टेस्ट करून घेतली पाहिजे. त्यांच्याकडे दुलर्क्ष करून चालणार नाही. जेवढ्या लवकर उपचार मिळतील आणि संपर्कात आलेल्यांना आयसोलेट केलं जाईल तेवढ्या लवकर त्याचा प्रसार थांबेल असंही ते म्हणाले.