मुंबई 17 सप्टेंबर: राज्यात दिवसभरात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांमध्ये उच्चांकी 24 हजार 619 नवे रूग्ण आढळून आलेत. तर 389 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 45 हजार 840 एवढी झाली आहे. दिवसभरात 19 हजार 522 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रिकव्हरी रेट हा 70.90 एवढा झाला आहे.
राज्याचा मृत्यू दर हा 2.47 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज सध्या 3 लाख 1 हजार 700 रुग्णावर उपचार सुरू आहेत.
नागरिकांनी सरकारच्या नियमांचं पालन करावं अशी सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे. मुंबईत नवे नियम नाही फक्त आधीच्याच आदेशाला मुदतवाढ देण्यात आल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या जे व्यवहार सुरू आहेत तसेच ते सुरू राहणार आहेत.
कोरोना रूग्णांची संख्या मुंबई वाढत आहे. त्याचबरोबर अनलॉकमुळे गर्दीही वाढत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे गर्दी कमी कशी करता येईल याची प्रशासनाला चिंता आहे.
अनावश्यक गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे दररोजचे व्यवहार पूर्ववत होत असतांनाच कोरोनाला कसं रोखायचं हा प्रश्न सरकारपुढे आहे.