मुंबई,09 मार्च: चीनमधून सुरू झालेल्या आणि सध्या भारतासह जगाच्या अनेक भागामध्ये झपाट्याने पसरण्याची भीती असलेल्या कोरोना व्हायरसची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात सध्या कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. कोरोनारूपी राक्षस भारतावर किती प्रभाव पाडणार हे पुढच्या काही दिवसात कळेलच. होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात सध्या सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी जिथे मोठ्या संख्येने लोक होळी, रंग, पाणी खेळण्यासाठी जमण्याची शक्यता आहे ते कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत. कोरोनासुराला जाळणार मुंबईच्या अनेक भागात ज्याप्रमाणे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात त्याच पद्धतीने होळी आणि धुळवड सुद्धा साजरी होत असते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे इथे परंपरागत राहणारा कोळी समाज आणि कोकणातून स्थायिक झालेली अनेक कुटुंब. होळीमध्ये वाईट विचार, कुप्रथा, चुकीच्या गोष्टींचं दहन व्हावं असं मानलं जातं. मुंबईतल्या बीबीडी चाळीत श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षी अनोख्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. यावर्षी कोरोना व्हायरसचं संकट असल्यामुळे इथे कोरोनासूर तयार करण्यात आला आहे. या कोरोनोसुराची होळी इथे सोमवारी केली जाणार आहे. यापूर्वी सुद्धा बीबीडी चाळीत श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने देशावर हल्ला करणारा दहशतवादी कसाब, पोलिसांवर हल्ले करणाऱ्या विकृतीचा 25 फुटी पुतळा, घोटाळेबाज नीरव मोदी आणि पीएनबी बँकेची प्रतिमा, तरुणांना वेड लावणाऱ्या पब्जी गेम अशा विविध सामाजिक विषयांवर होळी आयोजित केली जाते. यावर्षी वरळीत दुसऱ्या एका चाळीत कोरोनासूर बरोबरच हिंगणघाट मधल्या पीडितेला जाळणाऱ्या निकेश नगराळे याचा पुतळाही जाळला जाणार आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी होळी खेळताना काळजी घ्यावी, असं आवाहन मुंबई मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. होळीच्या काही आयोजकांनी आपापले कार्यक्रम रद्द केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.