जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Coastal Road project : बिपरजॉय सारखं चक्रीवादळही रोखू शकणार नाही मार्ग; कसा आहे अत्याधुनिक कोस्टल रोड प्रकल्प

Coastal Road project : बिपरजॉय सारखं चक्रीवादळही रोखू शकणार नाही मार्ग; कसा आहे अत्याधुनिक कोस्टल रोड प्रकल्प

कोस्टल रोड प्रकल्प

कोस्टल रोड प्रकल्प

Coastal Road project : मुंबईत कोस्टल रोडचे काम जोरात सुरू आहे. बृहन्मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता अखेरच्या टप्प्यात आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ऋचा कानोलकर, प्रतिनिधी मुंबई, 16 जून : मुंबईकर कोस्टल रोडचं काम पूर्ण होण्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल अशा प्रकारे कोस्टल रोडची निर्मिती करण्यात येतेय. या रोडसाठी वापरण्यात येणारे अनेक तंत्रज्ञानांचा देशात पहिल्यांदाच वापर होत आहे. आत्तापर्यंत दक्षिण कोस्टल रोडचं किती काम पूर्ण झालंय आणि कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना कुठून कसा प्रवास करता येणारे? जाणून घेऊयात न्यूज 18 लोकमतच्या स्पेशल रिपोर्टमधून. दोन किलोमीटर लांब बोगदे, 15 किलोमीटरचे तीन इंटरचेंज असणारा दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचलाय, या रोडमुळं मुंबईकरांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणारे. मुंबई ते कांदिवली 29 किमी लांबीचा संपूर्ण कोस्टल रोड आहे ज्यातून 10.58 किमी लांब असलेल्या दक्षिण मुंबईतील एका फेजचं काम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलंय. या प्रकल्पासाठी तब्बल 12,721 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. कोस्टल रोडच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या यंत्रांचा वापर करण्यात आला आहे. समुद्रतटाला लागून असला तरी कोस्टल रोडवरील वाहनांना समुद्राच्या उंच लाटांची काहीच भिती नाही, अगदी वादळ जरी आलं तरी उसळणाऱ्या लाटा रोखू शकेल इतकी मोठी 7.47 किलोमीटर लांब भिंत बांधण्यात आलीय. पाणी रोखण्यासाठी 1 ते 3 टन वजन असणाऱ्या आर्मर खडकांचा यात विशेष वापर करण्यात आलाय. संपूर्ण कोस्टल रोडवर एकूण 16 फ्लड गेट बांधण्यात आले आहेत. जेव्हा भरती आणि जोरदार पाऊस एकाच वेळी कोसळेल त्यावेळी हे फ्लड गेट बंद करण्यात येतील त्याचसोबत शहरात साचलेलं पाणी समुद्रात सोडण्यासाठी उपसून समुद्रात फेकलं जाईल अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कोस्टल रोड आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग सहा पदरी असणारे, या प्रकल्पात 3 इंटरचेंज आहेत ज्यात महत्त्वाचं ठिकाण आहे वरळी, वरळी हा एक कनेक्टर स्पॉट असणार आहे, विशेष म्हणजे कोस्टल रोडसोबत 1800 वाहनांची क्षमता असणारी चार भूमिगत वाहनतळंही तयार करण्यात येत आहेत, यापैकी 2 वाहनतळं वरळीत, 1 हाजी आली, महालक्ष्मी मंदिर तर 1 वाहनतळ प्रियदर्शनी पार्क इथे असेल. कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटरचेंज अमरसन्स गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. या इंटरचेंजची लांबी प्रत्येकी 15.66 किमी इतकी असेल. भराव टाकलेल्या जागेवर 70 हेक्टर हरितक्षेत्र तयार करण्यात येईल, इथे मुंबईकरांसाठी सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्यानं, जॉगिंग ट्रॅक, ओपन थिएटर अशा सौंदर्यकरण, मनोरंजनाच्या सुविधाही असतील, सोबतच समुद्रकिनारी थांबून आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्हप्रमाणे प्रोमिनेडही तयार करण्यात येतंय. मरीन ड्राईव्हपासून ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत कोस्टल रोडवर दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत, अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. या बोगद्यातून जाताना आपत्कालीन परिस्थितीत मदतीकरिता 11 क्रॉस पॅसेजही निर्माण केले गेलेत, जिथून मदत पोहोचवली जाऊ शकेल. त्य़ाचसोबत बोगद्याखालून केबल्स किंवा इतर नलिकांसाठी युटिलीटी बनवण्यात आलाय. मरिन ड्राईव्ह ते वरळी सीलिंक हे अंतर तब्बल 8 ते 10 मिनिटात पार करता येईल असा दावा पालिकेकडून करण्यात येतोय. सागरी किनारी रस्त्यामुळं 70% वेळेची बचत आणि 34% इंधनाचीही बचत होणारे, ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषणावरही नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचं म्हणजे दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी कायमची मार्गी लावणाऱ्या कोस्टल रोडचा प्रवास पूर्णपणे मोफत, विनाटोल करता येणार आहे, अशा या सुसज्ज, लेटेस्ट तंत्रज्ञान आणि सुविधांनी पूर्ण कोस्टल रोडची सफर करायला मात्र नोव्हेंबर 2023 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कुठून कसा असणार कोस्टल रोड? मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे. सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात