मुंबई, 7 जून : बॉलिवूडमधील अनेक हिट सिनेमांचा दिग्दर्शक राहिलेल्या सोहम शाह यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सोहम शाह यांनी जुहू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा नाट्यमयरित्या उलगडा झाला आहे.
जुहू पोलीस स्थानकाचे एपीआय गणेश तोडकर, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले आणि त्यांच्या टीमने याप्रकरणी तपास सुरू केला. त्यानंतर इमारतीत असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेण्यात आला. मात्र यावेळी पोलिसांना मदत झाली ती आरोपीच्या हातावर असलेल्या टॅटूची.
तोंडावर मास्क घातलेले आरोपी इमारतीत प्रवेश करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं. मास्कमुळे त्यांच्या ओळख पटत नव्हती. मात्र यातील एका आरोपीच्या डाव्या हातावर "MalikA" असा टॅटू होता. हा टॅटू पोलिसांच्या नजरेस पडला आणि तिथूनच सुरू झाला आरोपींचा शोध. एपीआय गणेश तोडकर, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले आणि त्यांच्या टीमने या टॅटूच्या आधारावर आरोपींना शोधण्यास सुरुवात केली.
विले पार्लेतील इंदिरा नगर इथे अखेर आरोपी पोलिसांच्या हाती लागले. दिग्दर्शक सोहम शाह यांच्या घरातील दोन सेलफोन आणि 3 हजार रुपये रोख रक्कम आरोपींनी पळवली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर याआधीही विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्या गुन्ह्यांचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood