मुंबई, 18 फेब्रुवारी : कोविड-19 विषाणूचा (Coronavirus) संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्ण संख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून काही मोठे निर्णय घेतले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज (दिनांक 18 फेब्रुवारी 2021) महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे बैठक घेतली. त्यावेळी आयुक्त चहल यांनी परिस्थितीचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले.
मुंबईत काय आहेत नवे नियम :
- वाढती रुग्ण संख्या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.
- लग्न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱया आयोजकांसह व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करावेत.
- मास्कचा उपयोग न करणाऱया नागरिकांवर कारवाई करण्यासाठी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये 300 मार्शल्स नेमावेत तसेच मुंबईतील मार्शल्सची संख्या दुप्पट करावी
- पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळणाऱया इमारती प्रतिबंधित (सील) कराव्यात, यासह विविध सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केल्या आहेत.
- ब्राझिलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्थात्मक विलगीकरणात
- रुग्ण वाढत असलेल्या विभागांमध्ये तपासण्यांची संख्या वाढवणार
हेही वाचा - मोठी बातमी : कोरोनाचा विळखा वाढला, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याने लादले कडक निर्बंध
दरम्यान, यावेळी आयुक्त चहल म्हणाले की, जून-जुलै 2020 मधील स्थितीच्या तुलनेत आजही कोविड 19 संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी कोविडचे रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नियमांचे पालन होत नसल्यास अधिक कठोरपणे कारवाई करुन वेळीच संसर्गाला अटकाव होणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai