अजित मांढरे, प्रतिनिधी
मुंबई, 13 जानेवारी : मुंबई महापालिकेची लूट शिंदे-फडणवीस सरकारकडून केली जात आहे. 400 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 6080 कोटी रूपयांचं हे टेंडर काढण्यात आलंय. या टेंडमधून कंत्राटदारांना 48 टक्के फायदा करून देण्यात आलाय, असा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत मातोश्रीला गेली 25 वर्ष टक्केवारीचा अनुभव आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्याही बोलण्यात तो दिसला, असा गंभीर आरोप केला आहे.
आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार : प्रवीण दरेकर
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत कंत्राट, कंत्राटदारांशी संबंध आणि टक्केवारीचा उत्तम अभ्यास दिसला. टक्केवारीचं गणित त्यांनी आज नीट मांडलं. खरंतर त्यांना कामाशी काही देणेघेणे नव्हते. फक्त टक्केवारीशी देणेघेणे आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंवर केली. राष्ट्रीय लेव्हलच्या कंपन्या काम करत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना भांबावलेलं पाहिलं. प्रशासकाच्या कामांवर प्रश्न उपस्थित होतो. आधी हेच चहल मातोश्रीवर जात होते. तेव्हा ते चांगलं काम करत होते. मुंबईसाठी तुमचं पुतना मावशीचं प्रेम दिसत आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद फुसका बार होती, असंही प्रवीण दरेकर शेवटी म्हणाले.
वाचा - 'ज्यावेळी तुमचं घर फुटेल तेव्हा...' बावनकुळेंच्या टीकेवर नाना पटोलेंचं उत्तर; बंडखोरांनाही इशारा
25 वर्षाच्या टेंडरची यादी काढा : प्रवीण दरेकर
मागील 25 वर्षाच्या टेंडरची यादी काढा म्हणजे दरोडे कुणी टाकले, हे समोर येईल. पोकळ आव आणायचा प्रयत्न करू नका. आदित्य ठाकरेंचा टक्केवारीचा उत्तम अभ्यास आहे. त्यांच्याकडे कंत्राटदारांची लिस्ट आहे. मातोश्रीला गेली 25 वर्ष टक्केवारीचा अनुभव आहे. ते वैफल्यग्रस्त झालेत शिंदे फडणवीस सरकारचे काम पाहून. मुंबई आपल्या हातून जातेय याची काळजी त्यांना वाटत आहे. मुंबईची जोशी मठ बनवू नका हे बोलुन आदित्य ठाकरे यांनी हिंदूचा अपमान केला आहे. मनोहर जोशींचा त्यांना विसर पडला असावा. त्यांना मुंबईकरांचे काही पडले नाही, अशी टीकाही दरेकरांनी केली.
मुंबईल लुटण्याचा डाव : आदित्य ठाकरे
"मुंबईतील कामं करण्याचा कालावधी हा 1 ऑक्टोबर ते 31 मे असा असतो. कारण उर्वरित काळात पाऊस असतो. पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतात. परंतु, आता हाती घेतलेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतील का याचा यांनी अभ्यास केला नाही. हे सर्व होत असताना कंत्राटदारांना 48 टक्के फायदा करून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांना मुंबईतील कामे कशी करतात हेच माहिती नाही. महापालिकेत कोणतीही बॉडी आणि महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाने ही कामे मंजूर कशी केली? हा खूप मोठा प्रश्न आहे. टेंडरचा हा पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. कामाची समज नसतानाही टेंडर काढण्यात आलं. मुंबईतील टेंडर हे इतर राज्यांतील टेंडरपेक्षा वेगळं असतं. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले जात आहेत. मग गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री हे मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ठाण्यातील रस्ते सिमेंटचे का केले नाहीत, असा प्रश्न यावेळी आदित्य टाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya Thackeray, Pravin darekar