मुंबई, 6 जून : रविवारी बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवरील निर्माणधीन पूल कोसळला. दुसऱ्यांदा हा पूल कोसळल्याने पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कंत्राटदारांवर कारवाईची मागणी होतेय. आता या कंत्राटदाराकडून मुंबईतही कामं देण्यात आल्याचं समोर आलंय. बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवरील निर्माणधीन पूल कोसळला. या पुलाचं कंत्राट एस. पी. सिंगला या कंत्राटदाराला देण्यात आलं होतं. अवघ्या काही सेकंदात हा पूल गंगा नदीत कोसळला. दोन वर्षांपूर्वीसुद्धा या पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे पुलासाठी 1 हजार 700 कोटी पाण्यात गेलेत. एस. पी. सिंगला या कंत्राटदाराला मुंबईतही कामं देण्यात आल्याचं समोर आलंय. गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपुल आणि उन्नत मार्गामधील पुलांची कामं या कंत्राटदाराला देण्यात आली आहेत. बिहारच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ही कंत्राटं रद्द करुन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी काँग्रेस आणि भाजपनं केलीय. ही कंत्राटं ठाकरेंच्या काळात दिल्याचा आरोप भाजपनं केलाय. बिहारच्या या घटनेनंतर एस. पी. सिंगला कंत्राटदाराला मुंबईत दिलेली कामं रद्द होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या डिझाईन आणि बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि त्रुटी आढळून आल्या आहेत. बांधकाम कंपनीने नदीच्या काठावर खांब बांधण्यासाठी 150 फूट खड्डा खोदला, पण तेवढ्याच उंचीचा खड्डा नदीच्या मध्य भागासाठीही वापरला गेला, जिकडे पाण्याची पातळी जास्त असते. कंपनीला नदीच्या मध्यभागी 200 फुटांपेक्षा जास्त खड्डा टाकण्याची गरज होती, त्यामुळे गेल्या 14 महिन्यांत दोनदा हा पूल कोसळला. नदीच्या मधोमध 22 खांब असून या सर्व खांबांची खोली 150 फूट खोल असल्याने या सर्व खांबांची दुरवस्था होणं अपरिहार्य होतं, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. कंपनी आधीही वादात इंडिया टुडेच्या अहवालानुसार, नितीश सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या लोहिया चक्र पथाच्या बांधकामादरम्यान तीन मुलांचा काँक्रीट स्लॅब पडल्याने मृत्यू झाला. मे 2020 मध्ये ही घटना घडली. या रोडचं काम एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्सलाच देण्यात आलं होतं, तेव्हा ही कंपनी पहिल्यंदा रडारवर आली. त्यावेळी या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते, मात्र नंतर बांधकाम कंपनीवर कोणतीही कारवाई झाली नाही. एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्सने बिहारमधील अनेक सरकारी प्रकल्प मिळवले आहेत, ज्यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), जवाहरलाल नेहरू रोडवरील लोहिया पथ चक्र आणि शेरपूर-दिघवारा पूल यासह पाटण्यात गंगा नदीवरील सहा लेन पूल यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







