मुंबई, 20 मार्च : पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याने केलेल्या गंभीर आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) हे वादात सापडले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह (Param Bir Singh Letter) यांनी अनिल देशमुख यांच्यावर थेट वसुलीचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता देशमुख यांनी सविस्तर पत्रक जारी करत आपल्यावर झालेले सर्व आरोप खोडून काढले आहेत, तसंच एक महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला आहे.
'श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री. परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल,' असं म्हणत अनिल देशमुख यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे. तसंच परमवीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला आहे. देशमुख यांच्या या निर्णयावर परमवीर सिंह नेमकं काय उत्तर देतात, हे पाहावं लागेल.
देशमुख यांचे परमवीर सिंह यांना बोचरे सवाल, नक्की काय म्हटलं आहे?
"सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ? आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंग यांनी दिनांक 16 मार्च ला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या chat च्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या chat वरून उत्तरे मिळविताना श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?
18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.
स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत. सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे," असं म्हणत अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Sachin vaze