मुंबई, 10 मे : मुंबई कोरोनामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाला असताना रुग्णालयातील भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे. अशातच सायन रुग्णालयानंतर आता केईएम रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मृतदेहाच्या बाजूला सर्वसामान्य रुग्णांवर उपचार केला जात असल्याचं दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसागणिक मोठी वाढ होत असताना जागा नसल्याने अनेक रुग्णांवर व्हरांड्यात उपचार केले जात आहेत. डोक्याला डोकं लावलेल्या अवस्थेत रुग्णांवर उपचार केले जात आहेत.त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. रुग्ण त्यांचे नातेवाईक, आरोग्य सेवक, डॉक्टर यांच्यात सोशल डिस्टन्स ठेवणे कठीण जात असल्याचंही पाहायला मिळत आहे.आरोग्य सेवकांना कोरोना होण्याचे एक मुख्य कारण रुग्णालयातील अशी अवस्था आहे, अशी टीका आता करण्यात येत आहे.
सायन रुग्णालयातही घडला होता धक्कादायक प्रकार मुंबईतील सायन रुग्णालयातील एक गंभीर बाब उघड झाली होती. सायन रुग्णालयातील अपघात विभागात एका बेडवर दोन रुग्ण ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आली. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने एकाच बेडवर 2 रुग्ण ठेवण्यात येत आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. अपघात विभागात बेडची संख्या मर्यादित असल्याचं रुग्णालयाचा म्हणणं आहे. मात्र याआधीही अशाच पद्धतीने काम होत असलं तरी कोरोनाच्या काळात हे धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काही कारवाई होते का, हे पाहावं लागेल. संपादन - अक्षय शितोळे