आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर हालचाली, क्वारन्टाइनसाठी सगळ्यात मोठी व्यवस्था

आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर हालचाली,  क्वारन्टाइनसाठी सगळ्यात मोठी व्यवस्था

शासकीय पातळीवर वेगवान हालचाली झाल्या आणि क्वारन्टाइनसाठी वरळीत मोठी व्यवस्था करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोनापासून दूर असलेल्या अकोला, नाशिक यांसारख्या जिल्ह्यातही या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. तसंच मुंबई शहर तर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरत आहे. त्यातच शिवसेनेचे युवानेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत रुग्णांची मोठी संख्या आढळली होती. त्यानंतर शासकीय पातळीवर वेगवान हालचाली झाल्या आणि क्वारन्टाइनसाठी वरळीत मोठी व्यवस्था करण्यात आली आहे.

वरळी येथील एनएससीआय डोम हे कोव्हिड -19 रूग्ण क्वारन्टाइनसाठी तयार केले आहे. महापालिकेने वरळी कोळीवाडा, प्रभादेवी, जिजामाता नगर प्रतिबंधात्मक केले आहेत. यातच अनेकांना क्वारन्टाइन केले जात असून अशा सर्व लोकांची एका ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी वरळी येथील एनएससीआय डोम येथे तयारी केली आहे. 1 हजार पेक्षा जास्त लोकांसाठी येथे बेड तयार केले आहेत. भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्यासाठी ही तजवीज करण्यात आली आहे.

देशात काय आहे स्थिती?

देशात आतापर्यंत 5 हजार 734 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळले आहेत. यातील जवळपास 472 लोक बरे झाले असून 166 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या आपत्तीचे भीषण आर्थिक परिणाम होणार असून, भारतात अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे जवळजवळ 40 कोटी कामगार हे गरिबीच्या आणखी भीषण खाईत लोटले जाण्याची भीती आहे.

या आपत्तीमुळे सध्याच्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जगभरातील 19.5 कोटी पूर्ण वेळ नोकऱ्या जाण्याचा, म्हणजेच 6.7 टक्के कामाचे तास वाया जाण्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांची कामगार संघटना असलेल्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने (आयएलओ) करोनाच्या साथीच्या रोजगारावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आढावा घेणारा 'आयएलओ मॉनिटर सेकंड एडिशन : कोविड-१९ आणि जगभरातील रोजगार' हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे.

जगभरात थैमान सुरूच

जगभरात करोनाबाधितांची संख्या 14 लाख 50 हजारांहून अधिक झाली आहे. तर कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात 85 हजारजणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र 3 लाख १6 हजार रुग्ण घरी परतले आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून 4 लाखाहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 9, 2020, 9:16 AM IST

ताज्या बातम्या