मुंबई, 24 जुलै : राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीवेळी दिल्लीत घडलेल्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेताना शेवटी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. मात्र त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शपथविधीवेळी केलेल्या या घोषणेला विरोध करत उदयनराजेंना समज दिली. त्यानंतर मात्र व्यंकय्या नायडू आणि भाजपविरोधात जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यानेही या प्रकरणावार बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्वीट करत 'जय भवानी, जय शिवाजी...जय जिजाऊ, जय शिवराय,' असं कॅप्शन लिहिलं आहे. दिल्लीतील प्रकरणानंतर वादंग निर्माण झालं असतानाच रितेश देशमुखने दिलेली ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
जय भवानी, जय शिवाजी,
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 24, 2020
जय जिजाऊ, जय शिवराय !! pic.twitter.com/aB9ZTP0mNS
वादावर काय म्हणाले उदयनराजे?
'रेकॉर्ड वर फक्त शपथ जाईल, असं सभापतींनी संगितलं. त्याच्यावर वाद विवाद होत आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने खूप राजकारण झाले. महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसणारा नाही. तिथल्या तिथे राजीनामा दिला असता,' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उदयनराजेंनी केला काँग्रेसवरच आरोप
'ज्यांनी आक्षेप घेतला ते नेते काँग्रेस की राष्ट्रवादीचे मला माहीत नाही.जे घडले नाही ते भासविण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी विनंती आहे. काँग्रेसच्या सदस्याने का आक्षेप घेतला याचे उत्तर मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला विचारा. आक्षेप घेताना राज्यघटनेचा आधार घेतला. नायडू यांनी चुकीचे केले नाही,' असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.