मुंबई, 7 मार्च : राजापूरमधील बाबू अवसरे (Babu Avsare) या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. कोकणातील (Kokan) हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'मायको' या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.
कोकणातील 10 आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम 5 मार्च रोजी अंधेरीतील मॅरिएट येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी 'मायको' ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली.
हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे. ''ही रक्कम म्हणजे शेतकऱ्यांनी केलेल्या प्रचंड परिश्रमांचा एक सन्मान आहे. कोकणातील आंबा बागायतदारासांठी बनवण्यात आलेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी मी मायको टीमचे अभिनंदन करतो'' असा आनंद राजेश अथायडे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - नाशिकमध्ये आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द होणार? कोरोनामुळे नवं संकट
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि राज्याचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चार शेतकऱ्यांच्या मुहूर्ताच्या पेट्या प्रत्येकी 25 हजार रुपये दर देऊन विकत घेतल्या. राजेश अथायडे यांनीच दुसरी पेटी 26 हजार, रमेश भाई यांनी 25 हजारमध्ये, सिंधुदुर्ग फार्मर प्रोड्युसरचे प्रसाद मालपेकर यांनी 15 हजारमध्ये, बांधकाम व्यावसायिक जगन्नाथ मोरे, आर्किटेक गणेश यादव, क्रिकेट कोच निलेश भोसले यांनी प्रत्येकी 12 हजारात पेट्या विकत घेतल्या.
लिलावात एकूण तीन लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 31 हजार रुपये प्रमाणे ही रक्कम समप्रमाणात दिली जाणार आहे. राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे आणि सुनैना रावराणे या तीन महिला उद्योजकांनी एकत्र येत कोकणातील परिश्रमी 100 शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी पिकवलेल्या हापूसचा ब्रँड बाजारात आणण्यासाठी 'MyKo' या मँगोटेक प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे.
या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या पिकवलेला शेतातील अस्सल हापूस आंबा ग्राहकांना थेट घरपोच मिळणार आहे. प्रत्येक पेटीवर असणार्या विशेष क्यूआर कोडद्वारे ग्राहकांना या आंब्याची लागवड कोणत्या शेतात आणि कधी करण्यात आली, शेतकर्याने कसे परिश्रम घेतले, त्याची बाग याची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे पाहता येईल. 'शेतकऱ्यांचे मनोबल वाढवत त्यांना त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदला देण्यासाठी मायकोचा जो हायटेक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. '' असे राज्याचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Maharashtra, Mumbai, Price hike, Super expensive