मुंबई : ऑनलाईन ब्रोकरेज कंपनी (Online brokerage company) झिरोदाने (Zerodha) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन हेल्थ चॅलेंज आणलं आहे. पुढील वर्षभरात जो कर्मचारी हेल्थ चॅलेंज 90 टक्के पूर्ण करेल, त्याला एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळेल आणि याशिवाय एक लकी ड्रॉ काढला जाईल, या लकी ड्रॉमधील बक्षिसाची रक्कम 10 लाख रुपये असेल, असं कंपनीचे सीईओ नितीन कामत यांनी जाहीर केलं आहे.
फिटनेस चॅलेंज हा एक ऑप्शनल प्रोग्रॅम आहे, त्यासाठी सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही स्वरूपात दररोज किमान 350 कॅलरी बर्न करणं आवश्यक आहे. वर्क फ्रॉम होम (WFH) आणि बसून राहणं हे एकप्रकारचं धूम्रपान आहे आणि त्याचा प्रसार वेगाने होत आहे, असं सीईओ म्हणाले.
“झिरोदामधील कर्मचाऱ्यांसाठी आम्ही आणलेलं आमचं नवीन हेल्थ चॅलेंज हे आमच्या फिटनेस ट्रॅकर्सवर दैनंदिन अॅक्टिव्हिटीजचं लक्ष्य सेट करण्याचा पर्याय देतं. पुढील वर्षभरात जो कर्मचारी हे चॅलेंज 90% टक्के पूर्ण करेल त्याला एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाईल. तसंच मोटिव्हेशन किकर म्हणून 10 लाख रुपयांचा एक लकी ड्रॉ काढला जाईल,” अशी माहिती नितीन कामत यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये दिली आहे.
“हा एक ऑप्शनल प्रोग्राम आहे. दिवसाला किमान 350 सक्रिय कॅलरी कोणत्याही स्वरुपात बर्न करा. आपल्यापैकी अनेक जण कोरोनाची साथ आल्यापासून घरून काम करत आहेत. एकाच जागी बसून राहून काम करणं हे एकप्रकारचं धुम्रपान आहे. याचे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात.
आम्ही कर्मचाऱ्यांनी आरोग्याबद्दल गांभीर्यानं विचार करत स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून हे हेल्थ चॅलेंज आणलंय. आमचे कर्मचारी आणि त्याचे कुटुंबीय मिळून हे हेल्थ चॅलेंज पूर्ण करतील, अशी आम्हाला आशा आहे,” असं त्यांनी सांगितलं.
कामत यांनी स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगितलं. कोविडनंतर माझं वजन वाढलं होतं, परंतु मी वेळीच अॅक्टिव्ह झालो आणि आता मी डाएटबद्दल अधिक जागरूक होत आहे. कोरोनानंतर माझं वजन वाढलं होतं. तेव्हा ट्रॅकिंग अॅक्टिव्हिटी हा फिट राहण्यासाठी उत्तम पर्याय असल्याचं मला लक्षात आलं.
मी मागच्या दोन वर्षांपासून माझ्या अॅक्टिव्हिटिज ट्रॅक करतोय आणि आता माझं टार्गेट 1000 कॅलरीज झालंय. त्यामुळे आता या हेल्थ चॅलेंजमध्ये इतरांना अॅक्टिव्हिटी ट्रॅकर वापरताना पाहणं, हे मनोरंजक असेल,” असं ते म्हणाले.
या वर्षी एप्रिलमध्ये झिरोदाच्या सीईओंनी त्यांच्या कर्मचार्यांसाठी एक आकर्षक ऑफर जाहीर केली होती. त्यानुसार, ज्या कर्मचाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा कमी आहे, त्यांना बोनस म्हणून अर्ध्या महिन्याचा पगार मिळेल. शिवाय, जर सर्व कर्मचार्यांचा एकत्रित बीएमआय 25 पेक्षा कमी असेल, तर प्रत्येकजण बोनस म्हणून आणखी अर्ध्या महिन्याच्या पगारासाठी पात्र असेल, अशी घोषणा कामत यांनी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Money matters