मुंबई, 26 सप्टेंबर: सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या खास प्रसंगी भेटवस्तू घेण्याची आणि देण्याची प्रथा जुनी आहे. या भेटवस्तू अनेक प्रकारच्या असू शकतात. वस्तू किंवा रोख स्वरूपात, डिजिटल चलनाच्या स्वरूपात. पण तुम्हाला माहिती आहे का की अशा भेटवस्तू आयकर विभागाच्या सवलतींच्या श्रेणीमध्ये समाविष्ट नसतील तर त्यावर कर आकारला जाऊ शकतो.त्यामुळे जर तुम्ही गिफ्ट घेतलं असेल किंवा दसरा, धनत्रयोदशी किंवा दिवाळीला गिफ्ट घेणार असाल तर तुम्हाला आयकराच्या तरतुदी माहित असणं आवश्यक आहे. आयकर कायदा 1961 चे कलम 56(2) भेटवस्तूंवरील कराचे नियम नमूद केलेल आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. कंपनीकडून मिळालेलं गिफ्ट- आयकर नियमानुसार जर एखाद्या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट व्हाउचर दिलं किंवा भेट म्हणून 5,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम दिली तर त्यावर कोणताही कर नाही. हा नियम एका आर्थिक वर्षासाठी आहे. परंतु भेटवस्तूची रक्कम आर्थिक वर्षात 5,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास ती पगाराचा भाग मानली जाते आणि कर्मचार्याला कर देय असतो. नातेवाईकाकडून भेट- नातेवाइकांकडून मिळालेली भेटवस्तू ही सर्व बाबतीत करमुक्तीच्या कक्षेत येते. नातेवाईकाकडून मिळालेल्या भेटवस्तूवर कोणताही कर आकारला जात नाही. तथापि, प्राप्तिकर कायद्यांतर्गत नातेवाईकाची माहिती दिली पाहिजे. म्हणजेच कर नियमांमध्ये नमूद केलेल्या नातेवाईकांकडून भेटवस्तू घेण्यावरच सूट मिळते. त्यात आई, वडील, भाऊ, बहीण आणि पती किंवा पत्नी यांचा समावेश होतो. हेही वाचा: TCS चा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई जर तुम्ही एखाद्या मित्राकडून भेटवस्तू घेतली तर… मित्रांकडून घेतलेल्या भेटवस्तू ‘इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात’ येतात. यासाठी एका आर्थिक वर्षात एकूण 50,000 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही एखाद्या मित्राकडून किंवा मैत्रिणींकडून वर्षभरात 50,000 रुपयांपर्यंतची भेटवस्तू घेतली तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यापेक्षा जास्त रकमेवर कर भरणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर नाही. लग्नात कोणी भेट म्हणून पैसे दिले तर त्यावर कोणताही कर नाही. भेटवस्तूमध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता- जर एखादी मालमत्ता भेट म्हणून घेतली असेल, तर त्या मालमत्तेचं मूल्य आणि मुद्रांक शुल्क मूल्य यांच्यातील फरक करपात्र गिफ्ट म्हणून गणला जातो. जर एखाद्या व्यक्तीनं मालमत्ता दुसर्या व्यक्तीला हस्तांतरित केली ज्याचं मूळ मूल्य आणि मुद्रांक शुल्क मूल्य 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर ती करपात्र भेट म्हणून गणली जाणार नाही.
कर कसा वाचवायचा? भेटवस्तूवरील कर वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण भेटवस्तूमध्ये रोख रक्कम, मालमत्ता घेतल्यास त्याची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त नाही. यापेक्षा जास्त रकमेची भेटवस्तू घेतली तरी त्यावर कर वाचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो पैसा कुठेतरी गुंतवणं. यामुळे तुम्हाला केवळ कर सूट मिळणार नाही, तर तुमचे करमुक्त उत्पन्नही वाढेल.