मुंबई, 3 सप्टेंबर: आयकर रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारिख जाऊन आता एक महिना उलटला आहे. मात्र, सध्या आयकर विभागामध्ये आयटीआर असेसमेंटची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत आयटीआर फाइलिंगमध्ये चुका करणाऱ्या करदात्यांना आयकर विभागाकडून नोटिसा येत आहेत. आयकर विभाग अनेक कारणांसाठी करदात्यांना नोटीस पाठवतो. आयकर विभागाकडून नोटीस का येतात आणि नोटीस मिळाल्यास काय करायचं ते आज आपण जाणून घेणार आहोत. आयकर विभागाकडून करदात्यांना अनेक प्रकारच्या नोटिसा येतात. भरलेला कर आणि करपात्र उत्पन्न यामध्ये तफावत असल्यास विभागाकडून नोटीस प्राप्त होते. आयकर रिटर्नमध्ये प्रचंड रिफंडचा दावा करणं देखील नोटीसचं कारण बनतं. तुम्ही कराच्या जाळ्यात आलात, पण कर भरला नाही, तरी नोटीस येईल. जर तुम्ही रिटर्न भरताना कमी उत्पन्न दाखवलं असेल तर विभागाची नोटीस येऊ शकते. आयटीआर रिटर्न भरताना, जर तुम्ही चुकीची गणना केली असेल, फॉर्म योग्यरित्या भरला नसेल, जास्त नुकसान दाखवलं असेल तर नोटीस येऊ शकते. जर तुम्ही नाव, पत्ता, पॅन, जन्मतारीख इत्यादी मूलभूत तपशील भरले नाहीत, तरीही आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. नोटीस आल्यावर काय करावे? प्रथम, कर विवरणपत्र योग्य आणि वेळेवर भरले पाहिजे. यानंतर, आयटीआर आणि फॉर्म AS 26 मध्ये भरलेल्या आयकर तपशीलांमध्ये फरक नाही याची खात्री करा. याशिवाय बँक खात्यात जमा करणे आणि पैसे काढणं देखील एका मर्यादेत असावं. जर तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर ती माहिती द्या. नोटीसला उत्तर देण्यासाठीची कालमर्यादा तपासा: प्राप्तिकर विभागाकडून नोटीस प्राप्त झाल्यावर, प्रथम नोटीस नीट वाचा आणि नोटीसचं कारण जाणून घ्या. नंतर नोटीसला उत्तर देण्यासाठी कालमर्यादा तपासा. नोटीसला मुदतीत उत्तर देणं आवश्यक आहे.दाखल केलेले रिटर्न आणि विभागाकडे उपलब्ध डेटा यांच्यात तफावत आढळल्यास, एकतर तुम्हाला अतिरिक्त कर भरावा लागेल किंवा तुम्हाला पैसे परत मिळतील. जर करदात्यानं प्राप्तिकर विभागानं केलेल्या कर मागणीला सहमती दिली तर नोटीससह पाठवलेल्या चालानच्या मदतीनं अतिरिक्त कर भरता येईल. हेही वाचा: Home Loan : गृहकर्ज घेण्यासाठी आकारलं जातं 11 प्रकारचं शुल्क, वाचा तपशील नोटीसला अचूक उत्तर देणं महत्त्वाचं: नोटीस समजली नसल्यास, तज्ञ किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA) कडून मदत घ्यावी. प्राप्तिकर विभागाच्या नोटीसलाही अचूक उत्तर देणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या तपासासाठी नोटीस आली असल्यास, प्राप्तिकर विभागानं मागितलेली सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रं द्या. विभागानं पाठवलेल्या नोटीसला उत्तर न दिल्यास आयकर नियमानुसार दंड भरावा लागू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.