Home /News /money /

कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं उल्लंघन; Apple च्या सप्लायर कंपनीने उपाध्यक्षांना दाखवला बाहेरचा रस्ता

कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं उल्लंघन; Apple च्या सप्लायर कंपनीने उपाध्यक्षांना दाखवला बाहेरचा रस्ता

कंपनीनेही आपल्या निवेदनात सर्व कर्मचार्‍यांची माफी मागितली आहे.

    नवी दिल्ली, 19 डिसेंबर : तायवानस्थित कंपनी विस्ट्रॉन कॉर्पोरेशनने कंपनीच्या उपाध्यक्षांना पदावरून काढून टाकले आहे. भारतात आयफोन मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. नुकतेच कर्नाटकच्या कोलार येथे कंपनीच्या एका प्लॅन्टमध्ये तोडफोड झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. विस्ट्रॉनने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांचे पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे आणि कामाच्या खराब स्थितीमुळे कर्मचार्‍यांनी हे पाऊल उचललं होतं. कंपनीनेही आपल्या निवेदनात सर्व कर्मचार्‍यांची माफी मागितली आहे. काय आहे प्रकरण? विस्ट्रॉन कॉर्पोरेशनने 12 डिसेंबर रोजी तायवान स्टॉक एक्सचेंजला कोलार जिल्ह्यातील नरसपुरा येथील आयफोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये झालेल्या हिंसाचाराचा अहवाल दिला. कर्मचार्‍यांनी त्यांना योग्य पगार मिळत नाही अशी तक्रार केली होती. कंपनीत महिलांची नियुक्ती केली जाते मात्र त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था नाही. त्यांना आठ ऐवजी 12 तासांचे काम दिले जाते. त्यांच्या सर्व तक्रारींकडे कंपनीकडून दुर्लक्ष केले जात होते. शेवटी एक दिवस कर्मचारी संतापले. विस्ट्रोनची पाच-सहा कंपन्यांसह आउटसोर्सिंगची व्यवस्था आहे, ज्याअंतर्गत एकूण 8,490 कंत्राटी कामगार आहेत. याव्यतिरिक्त, कायम कर्मचार्‍यांची संख्या 1,343 आहे. घटनेच्या वेळी जवळजवळ 2000 कर्मचारी रात्रीची पाळी पूर्ण केल्यावर कंपनीतून बाहेर पडत होते. त्यावेळी ते संतापले आणि त्यांनी फर्निचर, असेंब्ली युनिट्सचे नुकसान केले. याशिवाय त्यांनी वाहने जाळण्याचाही प्रयत्न केला. जाळपोळ दरम्यान काही सहकारी कर्मचार्‍यांनी घटनेचा व्हिडीओ शूट केला, ज्यामध्ये जमाव दारे, आरशे तोडताना, गाड्या पलटी करीत असताना दिसत होते. यामध्ये जमाव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या  कार्यालयावर निशाणा साधत असल्याचे दिसले. कंपनीचे सुमारे 437 कोटींचे नुकसान तायवानची कंपनी विस्ट्रॉन कॉर्पोरेशनने म्हटले आहे की, कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात त्याच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या हिंसाचारामुळे 437 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीचे कार्यकारी टीडी प्रशांत यांनी वेमगल पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ऑफिसची उपकरणे, मोबाइल फोन, मॅन्युफॅक्चरिंग मशिनरी आणि संबंधित उपकरणे असं मिळून 412.4 कोटी रुपये नष्ट झाले. याशिवाय सुमारे 10 कोटींची किंमत असलेल्या कार्यालयाचं नुकसान झालं असून 60 लाख रुपयांच्या कार आणि 1.5 कोटी रुपयांचं सामान चोरीला गेलं किंवा हरवलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Apple

    पुढील बातम्या