मुंबई, 22 ऑगस्ट: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) सुमारे 6 वर्षांपूर्वी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा सुरू केली. UPIद्वारे, वापरकर्ते युनिक आयडीद्वारे (UPI ID) कोणत्याही बँक वापरकर्त्यासोबत पैशाचे व्यवहार करू शकतात. वापरकर्ते UPI द्वारे त्यांचा UPI ID देखील जनरेट करू शकतात. पण हे फीचर फक्त स्मार्टफोन यूजर्ससाठीच होते. या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी UPI 123Pay नावाची नवीन UPI सेवा सुरू केली आहे. देशात 40 कोटींहून अधिक लोक फीचर फोन वापरतात आणि हे लक्षात घेऊन UPI123Pay उपलब्ध करून देण्यात आलं आहे. UPI123 सेवा वापरण्यासाठी UPI आयडी तयार करणं आवश्यक आहे. फोनवर UPI आयडी जनरेट करण्यासाठी तुमच्या फोनवरून *99# डायल करा. पुढे, तुमच्या बँकेचं नाव निवडा आणि नंतर तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक प्रविष्ट करा. त्यानंतर कार्डची एक्सपायरी डेट टाका. यानंतर तुम्हाला तुमचा UPI पिन सेट करण्यास सांगितलं जाईल. आता तुमचा UPI आयडी सक्रिय होईल. UPI123 वापरण्याची संपूर्ण पद्धत जाणून घेऊया… इंटरनेट कनेक्शनशिवाय UPI पेमेंट कसं करावं? UPI123 कसं वापरावं?
- तुमच्या फोनवरून IVR नंबर 08045163666 डायल करा
- IVR मेनूमधून तुमची भाषा निवडा
- आता, UPI शी लिंक केलेले बँक खातं निवडा
- बँक तपशीलांची पुष्टी करण्यासाठी 1 दाबा
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वापरून पैसे पाठवण्यासाठी पुन्हा 1 दाबा
- आता ज्या युजरला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर टाका
- आता तपशीलांची पुष्टी करा
- यानंतर तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम टाका
- तुमचा UPI पिन एंटर करा आणि पैसे हस्तांतरण ऑथराईज करा
या सुविधेद्वारे, वापरकर्ते त्यांच्या मित्र आणि कुटुंबाला पैसे पाठवू शकतात. याशिवाय वीज-पाणी, फास्टॅग रिचार्ज, मोबाईल बिल पेमेंट यासारख्या युटिलिटी बिलांव्यतिरिक्त खात्यातील शिल्लक देखील तपासता येते. ग्राहक UPI123 वापरून बँक खाती लिंक करू शकतील. यासोबतच, UPI पिन सेट करण्याव्यतिरिक्त, तुम्ही तो बदलूही शकाल. हेही वाचा- Jio पूर्वी Airtel 5G सेवा लाँच करणार? महाराष्ट्रातील या शहरांमध्ये सर्वप्रथम मिळणार सुविधा UPI123Pay मध्ये चार पर्याय उपलब्ध आहेत: अॅप-बेस्ड फंक्शनॅलिटी (App-based functionality)- तुमच्या फीचर फोनमध्ये एक अॅप इन्स्टॉल केलं जाईल, त्यानंतर स्मार्टफोनवर उपलब्ध असलेली अनेक UPI फंक्शन्स फीचर फोनवरही उपलब्ध असतील. मिस्ड कॉल (Missed call)- या सुविधेद्वारे फीचर फोन वापरकर्ते त्यांच्या बँक खात्याला एक्सेस करू शकतात. याशिवाय फंड ट्रान्सफर, फंड रिसीव्हिंग, नियमित खरेदी, बिल भरणं आदी बँक व्यवहार करता येतात. यासाठी मर्चंट आउटलेटवर दाखवलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर ग्राहकाला कॉल येईल आणि UPI पिन टाकून व्यवहार करता येईल. आईवीआर नंबर (Interactive Voice Response (IVR)- वापरकर्ते त्यांच्या फीचर फोनवरून IVR नंबरवर कॉल करून UPI पेमेंट करू शकतात. या प्रकारच्या UPI पेमेंटसाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही. Proximity sound-based payments- अशा प्रकारे वापरकर्ते साउंड वेव वापरून संपर्करहित, ऑफलाइन आणि प्रॉक्सिमिटी डेटा कम्युनिकेशनद्वारे कोणत्याही डिव्हाइसवरून पेमेंट करू शकतात. NPCI ने UPI123Pay साठी एक हेल्पलाइन नंबर देखील जाहीर केला आहे, ज्यावर दिवसभरात कधीही कॉल केला जाऊ शकतो. डिजिटल पेमेंट आणि इतर कोणत्याही माहितीसाठी युजर्स www-digisaathi.info ला भेट देऊ शकतात किंवा 14431 आणि 1800 891 3333 वर कॉल करू शकतात.