नवी दिल्ली: ब्रिटनच्या तिसर्या महिला पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरुवारी (20 ऑक्टोबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला. लिझ ट्रस यांनी युनायटेड किंग्डममध्ये केवळ 45 दिवस पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षानं ट्रस यांच्या जागी नवीन पंतप्रधान नेमण्यासाठी निवडणूक घेतली. त्यामध्ये माजी अर्थमंत्री आणि भारतीय वंशांचे ऋषी सुनक यांनी बाजी मारली आहे. 42वर्षीय ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या नागरिकाची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान होण्यास सज्ज सुनक कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. या वर्षी, संडे टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीनुसार, ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती 730 दशलक्ष पाउंड इतकी आहे. ब्रिटनमधील 250 श्रीमंतांच्या यादीत ते 22 व्या क्रमांकावर आहेत. टीव्ही 9 भारत वर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनच्या संसदेतील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ सभागृहातील सर्वांत श्रीमंत नेत्यांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती या ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अक्षता मूर्तींची वैयक्तिक संपत्ती 350 दशलक्ष पाउंड किंवा 460 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, 42 वर्षीय अक्षता मूर्ती यांच्याकडे वडील नारायण मूर्ती यांनी स्थापन केलेल्या इन्फोसिस लिमिटेडमधील स्टेकसह इतरही अफाट संपत्ती आहे. अवघ्या 20व्या वर्षीच बनले होते कोट्यधीश चान्सलर असताना ऋषी सुनक यांना एक लाख 51 हजार 649 पाउंड वेतन मिळत होतं. आता पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या वेतनात आणखी वाढ होईल. ब्रिटनच्या पंतप्रधानांचा वार्षिक पगार एक लाख 61 हजार 401 पाउंड असल्याचं म्हटलं जातं. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, सुनक हे दोन फायदेशीर हेज फंडांमध्ये पार्टनर होते. 2001 ते 2004 या कालावधीमध्ये ते गोल्डमन सॅक्स या गुंतवणूक बँकेचे अॅनॅलिस्ट होते. वृत्तानुसार, ऋषी सुनक हे वयाच्या 20व्या कोट्यधीश झाले होते. सात मिलियन पाउंड किमतीच्या घरात राहतात ऋषी आणि अक्षता संडे टाइम्सच्या वृत्तानुसार, ऋषी सुनक हे ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट होणारे पहिले आघाडीचे राजकारणी ठरले आहेत. सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची चार घरं आहेत. या पैकी दोन लंडनमध्ये, एक यॉर्कशायरमध्ये आणि एक लॉस अँजेलिसमध्ये आहे. लंडनमधील केन्सिंग्टन परिसरात त्यांचे पाच बेडरूमचे घर आहे. या घराची किंमत 7 दशलक्ष पाउंड असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या या चार मजली घरामध्ये एक खासगी बागदेखील आहे.
लंडनमधील ओल्ड ब्रॉम्प्टन रोड येथे या दाम्पत्याचं आणखी एक घर आहे. तिथे ते कधीतरी जाऊन राहतात. त्याच्याकडे यॉर्कशायरमध्ये ग्रेड-II जॉर्जियन हवेली आहे. ही हवेली 12 एकरांवर पसरलेली असून, त्यात एका मोठ्या तलावाचाही समावेश आहे. याशिवाय, कॅलिफोर्नियातील समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांचं एक ‘पेंट हाऊस’ आहे. तिथे ‘बेवॉच’ या हॉलीवूडपटाचं चित्रिकरण झालेलं आहे.