मुंबई, 16 ऑगस्ट : डिजिटल युगात अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. अनेक कामं घरबसल्या घरातून होत आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेट हे लोकांसाठी महत्त्वाची साधनं बनली आहेत. तंत्रज्ञानामुळे लोकांना फायदे झाले आहेत. मात्र सोबतच फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार विविध मार्गांनी नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न करत असतात. यूजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स लाँच करत असतात. हीच बाब लक्षात घेत अनेक वेळा सायबर गुन्हेगार मोफत इंटरनेटचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करतात. सायबर गुन्हेगार आता टेलिकॉम कंपन्यांच्या नावाने यूजर्सना मेसेज पाठवत आहेत. ज्यामध्ये या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला मोफत इंटरनेट मिळेल, असं आमिष लोकांना दिलं जातं. तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पीआयबीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. पीआयबीने ट्वीट करून म्हटले आहे की, मोफत इंटरनेट डेटाची ऑफर अतिशय आकर्षक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण कधीकधी ते धोकादायक असते. अशा फेक मेसेजद्वारे फसवणूक टाळण्यासाठी विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. अलीकडे असेच कोरोना लसीशी संबंधित बनावट संदेश देखील पाहिले गेले आहेत. लसीचा डोस पूर्ण झाल्यावर सरकार मोफत रिचार्जची भेट देत असल्याचा मेसेजद्वारे दावा करण्यात आला आहे. अशा मेसेजेसवर कधीही विश्वास ठेवू नका.
We know 'free internet data offers' can be enticing but sometimes things are just too good to be true.
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 10, 2022
With this #PIBFactCheck, let's take a look at some important tips that will help you stay clear of online recharge frauds! pic.twitter.com/0Gsv1K0wTO
नुकताच असाच एक मेसेज पाहायला मिळाला. ज्यामध्ये नीरज चोप्रा ऑलिम्पिक पदक जिंकल्याच्या आनंदात भारतातील मुलांना ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी मोफत रिचार्ज देणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी तुम्हाला ब्लू लिंकवर क्लिक करावे लागेल. असे मेसेज तुम्हाला आले तर काय कराल? » मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. » मेसेजशी संबंधित कुणालाही वैयक्तिक माहिती देऊ नका. » मेसेज फॉरवर्ड करु नका. » मेसेज डिलिट करुन टाका.