नवी दिल्ली, 5 जानेवारी: नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही आपल्या मुलीला चांगल्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana – SSY) भेट म्हणून देऊ शकता. सरकारी सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची संधी तर देईलच. सोबतच तुमच्या लेकीच्या उच्च शिक्षण, करिअर आणि लग्नाच्या आर्थिक तरतूदीची चिंताही मिटेल. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला खातं उघडता येईल.
नेमकी काय आहे सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी केंद्र सरकारची एक छोटी बचत योजना (Savings Scheme) आहे. ही योजना मुलगी वाचवा-मुलगी शिकवा या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. छोट्या बचत योजनांमध्ये सर्वात चांगला व्याजदर असणारी ही योजना आहे.
कसं उघडता येईल सुकन्या समृद्धी योजना खातं
सुकन्या समृद्धी योजनेचं खातं हे कोणतीही मुलगी 10 वर्षांची व्हायच्या आत कमीत कमी 250 रुपये भरून उघडता येतं. चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, तुम्ही वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये एवढी रक्कम जमा करू शकता. सध्या या योजनेवर 7.6 टक्क्याने व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या मुलीसाठी दोन खातीसुद्धा उघडू शकते. वयाच्या 21 व्या वर्षी मुलगी या खात्यातून पैसे काढू शकते. या योजनेमध्ये 9 वर्ष 4 महिन्यांतच रक्कम दुप्पट होते.
कुठे उघडता येईल सुकन्या समृद्धी योजना खातं
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा खासगी बँकेच्या अधिकृत शाखेत जाऊ शकता.
416 रुपयाच्या रोजच्या बचतीमध्ये मिळतील तब्बल 65 लाख रुपये
जर तुम्ही 2022 सालापासून गुंतवणूकीला सुरूवात केली आणि तुमच्या मुलीचं वय 1 वर्ष आहे. आता रोज तुम्ही 416 रूपयांची बचत केली तर तुम्हाला महिन्याला 12,500 रूपये गुंतवावे लागतील. 12,500 रूपये प्रत्येक महिन्याला जमा केल्यास तुम्हाला वर्षाला 1.5 लाख रूपये गुंतवावे लागतील. जेव्हा 2043 साली तुमची मुलगी 21 वर्षांची होईल तेव्हा योजना पूर्ण होईल. त्यावेळी तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम 6,500,000 रूपये एवढी असेल.
खातं केव्हापर्यंत सुरू ठेवता येईल
सुकन्या समृद्धी योजनेचं खातं हे सुरू केल्यापासून मुलीच्या 21 व्या वर्षांपर्यंत किंवा 18 व्या वर्षानंतर तिचं लग्न होईपर्यंत तुम्ही चालू ठेवू शकता.