नवी दिल्ली, 24 डिसेंबर : कोरोनामुळे ( Corona ) अनेकांच्या नोकऱ्या ( jobs ) गेल्या. खासगी क्षेत्रात ( private sector ) कुठल्याही नोकरीमध्ये श्वाश्वती नाही, याची खात्रीच अनेकांना पटली. त्यामुळे अनेकजण नोकरीपेक्षा व्यवसाय ( business ) बरा, असं म्हणत कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाचा शोध घेऊ लागले आहेत. तुम्हीही कमी गुंतवणुकीत लाखो रुपयांचा नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला आज आम्ही अशा व्यवसायाची माहिती देत आहोत, ज्याला सरकार सबसिडीदेखील देत आहे. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे.
तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर आज अशा व्यवसायाची माहिती देत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला थोडीच गुंतवणूक करावी लागेल. पण त्यातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. कोणीही हा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतो. हा व्यवसाय शेतीपूरक ( agricultural ) असून तो म्हणजे मखाण्याची ( Makhana ) शेती. मखाणा म्हणजे कमळाचं बी. हे असे उत्पादन आहे, ज्याला बाजारात नेहमीच मागणी असते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ते अगदी आवडीने मखाणे खाल्ले जातात. खेड्यापासून शहरांपर्यंत प्रत्येक हंगामात याला खूप मागणी असते.
हे ही वाचा-Career Tips: मेडिकल क्षेत्रातील 'हे' कोर्सेस केल्यानंतर लगेच मिळू शकते नोकरी
72,750 रुपये अनुदान
जगातील 80 ते 90 टक्के मखाणा फक्त भारतातच तयार होतो. बिहारमध्ये याची शेती मुबलक प्रमाणात केली जाते. बिहारमधील 8 जिल्ह्यांमध्ये मखाण्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यात कटिहार, दरभंगा, सुपौल किशनगंज, पूर्णिया, सहरसा, अररिया, पश्चिम चंपारण जिल्ह्यांचा समावेश आहे. हे सर्व जिल्हे मिथिलांचल प्रदेशात येतात. बिहारच्या नितीश सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने 'मखाणा विकास योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 72,750 रुपये अनुदान दिलं जातं.
अशी करा लागवड
मखाण्याची लागवड वर्षातून दोनदा केली जाते. विशेष म्हणजे हे तलावात तसेच शेतातदेखील लावता येते. मात्र, शेतात लागवड करण्यासाठी शेतात पाणी असणे आवश्यक आहे. या पिकाची वर्षातून दोनदा शेती केली जाते. जर मखाणा मार्च महिन्यात लावला असेल, तर तो ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कापला जातो. तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लागवड केली गेल्यास फेब्रुवारी-मार्चमध्ये कापला जातो. आधी मखाण्याच्या बिया पेरून रोपवाटिका तयार केली जाते..नंतर ती रोपे शेतात लावली जातात. पण तलावात मखाण्याची लागवड करायची असल्यास, त्याची रोपं तलावात टाकली जातात.
हे ही वाचा-क्या बात है! बिझिनेस क्षेत्रात करा करिअर; अवघ्या 50 हजारात सुरु करा हे Business
लाखो रुपयांचे मिळेल उत्पन्न
एका हेक्टरमध्ये मखाणा पिकवण्यासाठी 97,000 रुपये खर्च येतो. यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केल्यास, एका हंगामात किमान 1 ते 1.5 लाख रुपये मिळतात.या पिकाची लागवड वर्षातून दोनदा केली जाते. याचाच अर्थ या शेतीतून वर्षभरात तीन लाख रुपयांपर्यंत सहज उत्पन्न मिळू शकते. बाजारात मखाण्याची किंमत 500 ते 800 रुपये किलोपर्यंत आहे. सहसा त्याची किंमत कमी होत नाही.
मखाणा म्हणजे फुल्ल टाईमपास आणि पौष्टिक खाद्य, पॉपकॉर्नसारखं. मखाणा म्हणजे कमळाचं बी, पण याला मखाणा याच नावाने सर्वत्र ओळखले जाते. खाण्यासाठी हे पौष्टिक खाद्य असल्याने त्याचा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला फायदा होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.