हरिश दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी : एकीकडे वाढणारी महागाई असताना मात्र दुसरीकडे साईंच्या चरणी लोकांनी आपल्या खिशाला जमेल तर म्हणत दान दिलं आहे. वाढत्या महागाईतही साईंचरणी भरभरुन दान दिल्याची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपल्या आहेत. मात्र या सुट्टीमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींची दान जमा झालं आहे.
20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसांत तब्बल 18 कोटी रुपयांचे भरभरुन दान भाविकांनी साईंच्या चरणी अर्पण केलं. यामध्ये रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, चेक, सोनं, चांदी, परकीय चलन यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देणगी काउंटरवर ७ कोटी ५४ लाख ४५ हज़ार ४०८ रुपये जमा झाले आहेत. ऑनलाइन देणगीच्या स्वरुपात १ कोटी ४५ लाख ४२ हज़ार ८०८ रुपयांची रक्कम जमा झाली आहे. चेक / डीडी देणगी ३ कोटी ३ लाख ५५ हजार ९४६ रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.
मनीआर्डरद्वारे ७ लाख २८ हजार ८३३ रुपये तर डेबिट क्रेडिट कार्डद्वारे १ कोटी ८४ लाख २२ हजार ४२६ रुपये साईंचरणी अर्पण करण्यात आले आहेत. साईंचरणी ३९.५३ लाख २९ रुपयांचं सोनं तर ६.४५ लाख रुपयांची चांदी भाविकांनी देणगी म्हणून अर्पण केली आहे. यामध्ये २४.८० लाख रुपयांचे परकीय चलनही असल्याची माहिती मिळाली आहे.
एकीकडे महागाई वाढत आहे. घरगुती गॅसपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्येही साईंच्या चरणी भाविकांनी भरभरुन दान दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा हे दान कमीच असल्याचं सांगितलं जात आहे.
2020 रोजी 64.500 ग्रॅम सोने आणि डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये 1 कोटी 22 लाख 50 हजार 822 रुपये आणि 6 देशांकडून परकीय चलन मिळालं होतं. त्यामुळे महागाईचा फटका हा साईंच्या दानपेटीलाही बसल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.