मराठी बातम्या /बातम्या /मनी /Shark Tank India : 13 वर्षांच्या मुलीनं तयार केला अ‍ॅप, गुंतवणूक झाली 50 लाखांची!

Shark Tank India : 13 वर्षांच्या मुलीनं तयार केला अ‍ॅप, गुंतवणूक झाली 50 लाखांची!

शाळेत लहान मुलामुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांना किंवा पालकांना गुप्तपणे त्याविषयी तक्रार करता यावी यासाठी तिनं

शाळेत लहान मुलामुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांना किंवा पालकांना गुप्तपणे त्याविषयी तक्रार करता यावी यासाठी तिनं

शाळेत लहान मुलामुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांना किंवा पालकांना गुप्तपणे त्याविषयी तक्रार करता यावी यासाठी तिनं 'अँटी बुलिंग स्क्वाड (ABS) हा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि 'कवच' नावाचं एक मोबाइल अ‍ॅप तयार केलं

  मुंबई, 16 फेब्रुवारी : 13 वर्षांच्या शाळकरी मुलीने (School Girl) तयार केलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण अ‍ॅपमध्ये तब्बल 50 लाखांची गुंतवणूक (Investment) करण्याची तयारी 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या रिअ‍ॅलिटी शोमधल्या तीन परीक्षकांनी दर्शवली आहे. या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपली उद्योजकीय संकल्पना मांडणारी आणि त्यासाठी निधी मिळवणारी ही सर्वांत लहान स्पर्धक आहे.

  अनुष्का जॉली असं या मुलीचं नाव असून, शाळेत लहान मुलामुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांना किंवा पालकांना गुप्तपणे त्याविषयी तक्रार करता यावी यासाठी तिनं 'अँटी बुलिंग स्क्वाड (ABS) हा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि 'कवच' नावाचं एक मोबाइल अ‍ॅप तयार केलं आहे. त्यामुळे सध्या अनुष्का जॉलीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  अनुष्का जॉली गुरग्राममधल्या (Gurugram) दी पाथवेज स्कूलमध्ये (The Pathways School) आठवीत शिकते. पाच वर्षांपूर्वी म्हणजे अवघी नऊ वर्षांची असताना शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी मोठी मुलं एका सहा वर्षांच्या मुलीची टिंगल करत असताना अनुष्कानं पाहिलं. ती छोटीशी मुलगी अगदी घाबरून गेली होती. अनुष्काच्या मनावर या घटनेनं खोल परिणाम केला. अनेकदा लहान मुलामुलींना शाळेतील मोठी मुलं त्रास देतात, धमकावतात. त्यामुळे लहान मुलं घाबरतात आणि त्याविषयी कोणाला काही सांगत नाहीत. अशा वेळी त्यांना किंवा पालकांनाही आपल्या मुलांना होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार करायची असेल तर ती गुप्तपणे करता यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची कल्पना अनुष्काच्या मनात आली. याच विचारातून तिनं तीन वर्षांपूर्वी अँटी बुलिंग स्क्वाड (Anti Bullying Squad -ABS) हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि त्यानंतर तिनं अलीकडेच 'कवच' (Kavach) हे एक अ‍ॅप तयार केलं आहे.

  याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना ती म्हणाली, 'त्या मुलीबाबत घडलेली ती घटना कायमची माझ्या मनात घर करून बसली. माझ्या मित्रांनी त्या सहा वर्षांच्या मुलीची खोडी काढण्याचं ठरवलं आणि ते तिच्याकडे गेले. तिचं नाव घेऊन ते तिची टिंगलटवाळी करू लागले, तिला हसू लागले. मी तेव्हा 9 वर्षांची होते. मीदेखील घाबरले होते. काही करू शकत नव्हते. अगदी असहाय झाले होते. माझ्या लक्षात आलं की, अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. माझ्या वयाची अनेक लहान मुलं अशा त्रासाला बळी पडतात. त्यामुळे ती त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात. यावर काही तरी उपाय शोधला पाहिजे असं मला वाटू लागलं आणि त्यातूनच मला अँटी बुलिंग स्क्वाडची (ABS) कल्पना सुचली.

  गेल्या तीन वर्षांपासून अनुष्का 'अँटी बुलिंग स्क्वाड (ABS)' चालवत असून, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि तज्ज्ञांचा यात सहभाग आहे. आतापर्यंत 100 हून अधिक शाळा आणि विद्यापीठांमधल्या 2000 हून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. बुलिंग म्हणजेच दादागिरी, गुंडगिरी आणि त्याचे परिणाम याबाबत या प्लॅटफॉर्मद्वारे जागरूकता निर्माण केली जाते. तसंच अशा घटनांना प्रतिबंध करण्याची शपथ दिली जाते. त्याचप्रमाणे याबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या वस्तूंची विक्रीही (Merchandise) या प्लॅटफॉर्मद्वारे केली जाते.

  हा प्लॅटफॉर्म चालवत असताना अनुष्काच्या लक्षात आलं की, अशा घटनांची तक्रार नोंदवली जात नाही. त्यामुळे त्यावर कारवाईही केली जात नाही. परिणामी त्यांना अजूनच प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा घटनांना बळी पडलेले विद्यार्थी, तसंच पालक यांनाही आपलं नाव गुप्त ठेवून तक्रार करण्यासाठी एखादी सुविधा उपलब्ध केली पाहिजे असं तिला वाटू लागलं आणि त्यातूनच तिनं 'कवच' हे मोबाइल अ‍ॅप तयार केलं. आता हे अ‍ॅप आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी अँटी बुलिंग अ‍ॅम्बेसेडर्सचं मजबूत जाळं निर्माण करण्याची तिची योजना आहे.

  याकरिता निधी मिळवण्यासाठी तिनं 'शार्क टँक'मध्ये आपली संकल्पना मांडली. तिची कल्पना आवडल्यानं पीपल ग्रुप आणि शादी डॉट कॉमचे (Shadi.com) संस्थापक, तसंच सीईओ अनुपम मित्तल यांच्यासह 'बोट'चे (boAt) सह-संस्थापक अमन गुप्ता यांनी 50 लाख रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं. या शोच्या पहिल्या पर्वात 50,000 अर्जांमधून फक्त 198 उमेदवारांची निवड झाली आहे.

  एक चार्टर्ड अकाउंटंट आणि उद्योजकाची मुलगी असलेल्या अनुष्का जॉलीनं भविष्यात उद्योजक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे हे अद्याप ठरवलेलं नाही. 'मला फक्त उद्योजक व्हायचं आहे. सध्या 'कवच' अ‍ॅप दाखल करण्यास अधिक उत्सुक आहे,' असं अनुष्का जॉलीनं सांगितलं. जास्तीत जास्त मुलांपर्यंत गुंडगिरीविरोधी संदेश पोहोचवण्यासाठी, देशभरात तसंच जगभरात वेबिनार आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून याचा प्रचार करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही तिनं सांगितलं.

  अनुष्काच्या या यशाबद्दल पाथवे स्कूलचे संचालक कॅप्टन रोहित सेन बजाज यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. 'आम्हाला अनुष्का जॉलीचा खूप अभिमान वाटतो. 'शाळा आणि कॅम्पसमधली गुंडगिरी दूर करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासह ती तरुण आणि ज्येष्ठांनाही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याकरिता सक्षम करत आहे. तिची ही धडाडी, जिद्द अत्यंत कौतुकास्पद आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.

  First published:
  top videos