Home /News /money /

FD मध्ये पैसे गुंतवताय? योग्य वेळी जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळतील ते वाचा..

FD मध्ये पैसे गुंतवताय? योग्य वेळी जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळतील ते वाचा..

FD हा गुंतवणुकीचा पर्याय लोकप्रिय असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे यात गुंतवलेलं मुद्दल कधीही धोक्यात येत नाही.

नवी दिल्ली, 25 मे: कोरोनामुळे सध्या आर्थिक बाबतीत देशपातळीवरही आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक पातळीवरही अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून उचलावं लागत आहे. कधी काळी केलेली बचत या कठीण प्रसंगी कामी येत आहे. बचत करण्याचे अनेक पर्याय आजच्या जगात उपलब्ध आहेत; मात्र त्यात सर्वाधिक लोकप्रिय पर्याय म्हणजे बँकेतलं फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit - FD) अर्थात मुदत ठेव. वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या अत्यंत बिकट परिस्थिती असल्यामुळे सर्व प्रकारच्या बचत आणि गुंतवणूक योजनांवरचे (Investment Schemes) व्याजदर कमी झाले आहेत. त्याचा फटका 'एफडी'नाही बसला आहे. एफडीमध्ये एक ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक (Investment) करता येते. त्यात कालावधीनुसार साडेपाच ते साडेसहा टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) व्याजदर थोडा जास्त असू शकतो. FD हा पर्याय लोकप्रिय असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे यात गुंतवलेलं मुद्दल कधीही धोक्यात येत नाही. शेअर बाजाराशी निगडित पर्यायांमध्ये गुंतवणूक केली, तर बाजार वर-खाली होतो त्याप्रमाणे मूळ रक्कम कमी-जास्त होऊ शकते. रक्कम कमी होण्याचा धोका एफडीमध्ये नाही. शिवाय जो काही व्याजदर असेल, त्यानुसार परतावाही मिळतोच. त्यामुळे तुलनेने व्याजदर कमी असले, तरी लोकांना एफडी (FD) हा पर्याय सुरक्षित वाटतो. अगदीच गरज पडल्यास एफडी मुदतीआधीच मोडताही येते. त्यात व्याजाचं थोडं नुकसान झालं, तरी मुद्दल धोक्यात येत नाही. या बँकांच्या विलिनीकरणाबाबत RBIकडून गाइडलाइन्स जारी, तुमच्यावर काय होणार परिणाम ... पण असं असलं तरीही बँक किंवा ज्या कोणत्या संस्थेत एफडी करायची आहे, त्या संस्थेची/बँकेची निवड विचार करून केली नाही, तर मात्र पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. म्हणूनच एफडी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यावश्यक असतं. त्याबद्दल थोडी माहिती घेऊ या. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. - CRISIL किंवा ICRA यांसारख्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आर्थिक संस्थांना, बँकांना क्रेडिट रेटिंग (Credit Rating) देत असतात. ज्यांचं रेटिंग चांगलं असतं, त्या संस्था अर्थातच चांगल्या/विश्वासार्ह असतात. त्यामुळे एफडी करताना किंवा गुंतवणूक करताना संबंधित संस्थेचं क्रेडिट रेटिंग पाहूनच गुंतवणूक करावी. संबंधित संस्थेची अन्य माहिती, बाजारपेठेतलं स्थान, लौकिक आदींचीही माहिती घ्यावी. या सगळ्या बाबींची खात्री केल्यावर गुंतवणूक केल्यास पैसे सुरक्षित राहतील आणि वेळेवर परतावाही मिळेल. केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक करून व्हा मालामाल! वाचा कोणत्या आहेत सुरक्षित योजना - मोठी रक्कम गुंतवायची असेल, तर एकाच बँकेत सगळी रक्कम गुंतवू नये. वेगवेगळ्या बँकांत एफडी कराव्यात, तसंच त्यांचा कालावधीही वेगवेगळा निवडावा. म्हणजे दीर्घ काळापर्यंत व्याज मिळत राहील. गुंतवणूक केलेल्या रकमेच्या सुरक्षिततेसाठी आता सरकारने इन्शुरन्सची सोयही दिली आहे. पूर्वी एक लाखापर्यंतच्या ठेवींना इन्शुरन्स मिळायचा. आता तो पाच लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीला मिळतो. - बँकांच्या एफडीच्या व्याजदरांचा तुलनात्मक अभ्यास करून मगच गुंतवणूक करावी. वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर वेगवेगळे असतात. तसंच, काही बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 0.5 टक्क्यांपर्यंत जास्त व्याज दिलं जातं. - एफडीमध्ये काही प्रकारही असतात. काही एफडीवर मिळणारं व्याज मूळ रकमेतच वाढवलं जातं आणि मुदत पूर्ण होईपर्यंत तसंच झाल्यामुळे चक्रवाढ दराने व्याज मिळू शकतं. काही एफडीमध्ये मिळणारं व्याज ठरावीक कालावधीने आपल्याला काढून घेण्याची/आपल्या बँकेत जमा होण्याची सुविधा असते. गुंतवणुकीची रक्कम मोठी असेल, तर या व्याजाच्या रकमेचा आपले खर्च भागवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आपलं मूळ मुद्दल तसंच राहतं. - एफडीवर कर्जही घेता येतं. अत्यंत आणीबाणीची परिस्थिती आल्यास एफडीवरच्या कर्जाचा पर्याय अवलंबता येतो. आपल्या मुद्दलाच्या 90 टक्के रकमेपर्यंत आपल्याला कर्ज (Loan) मिळू शकतं. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी एफडीच्या मॅच्युरिटीपर्यंतचा (Maturity) असू शकतो. एफडीवरच्या कर्जाचा व्याजदर 0.5 टक्के ते 2 टक्क्यांपर्यंत असू शकतो. हा व्याजदर अन्य कर्जांपेक्षा कमी असतो. - काही गरज पडल्यास एफडी आपल्याला मॅच्युरिटीच्या पूर्वीही तोडता येते. त्यासाठी बँकेनुसार वेगवेगळं शुल्क आकारलं जातं. हे शुल्क 0.5 टक्के ते एक टक्क्यांपर्यंत असू शकतं. काही बँका दंड न घेताही एफडी मोडायला परवानगी देतात; मात्र वेगळ्या काही अटी असू शकतात. मॅच्युरिटीच्या किती काळ आधी एफडी मोडली जाते, यावर दंडाची रक्कम अवलंबून असते.
First published:

Tags: Investment, Savings and investments

पुढील बातम्या