नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : पेट्रोल-डिझेलचे दर (petrol and diesel rate) सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर जात आहेत. सध्या जरी केंद्र सरकारने दिवाळी भेट म्हणून दरांमध्ये काहीसा दिलासा दिला असला तरी इंधनाचे भाव परवडणारे नाहीत. इंधनाबाबत अशी एका बाजूला स्थिती असताना बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात अशी एक अनोखी मशीन बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये एका बाजूला प्लॅस्टिकचा कचरा टाकला जातो आणि दुसऱ्या बाजूने पेट्रोल आणि डिझेल बाहेर पडतं. ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट (petrol and diesel made from waste plastic) खरी आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये वेस्ट टू फ्युएल प्रकल्पाची स्थापना
प्लॅस्टिक कचऱ्यापासून पेट्रोल आणि डिझेल बनवण्याचा हा अत्याधुनिक प्लांट बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे, जिथे उत्पादनही सुरू करण्यात आलं आहे. इतकेच नाही तर अनेकांनी पहिल्याच दिवशी या प्लांटमधून पेट्रोल आणि डिझेलची खरेदीही केली. बिहारचे महसूल आणि जमीन सुधारणा मंत्री राम सुरत राय यांनी या प्लांटचे उद्घाटन केले. प्लांटचे उद्घाटन केल्यानंतर राम सुरत यांनी येथून 10 लिटर डिझेलही खरेदी केले.
डिझेल फक्त 70 रुपये प्रति लिटर
खरोना, मुझफ्फरपूर येथे उभारण्यात आलेल्या या प्लांटबद्दल सीईओ आशुतोष मंगलम म्हणाले की, दररोज 200 किलो प्लास्टिक कचरा वापरला जाईल, ज्यातून 130 लिटर पेट्रोल आणि 150 लिटर डिझेल तयार होईल. महापालिकेकडून प्लास्टिकचा कचरा 6 रुपये किलो दराने विकत घेणार असून अवघ्या 6 रुपयांत 70 रुपयांचे इंधन तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, एक लिटर डिझेल तयार करण्यासाठी एकूण खर्च सुमारे 62 रुपये प्रति लिटर इतका असेल, त्यामुळेच ते 70 रुपये प्रति लिटरने विकले जाईल. प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन तयार करण्यासाठी 8 तास लागतात.
हे वाचा - नोकरी सोडून उद्योजक व्हायचंय? मग ‘या’ 7 गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात
कचऱ्यापासून इंधन कसे बनवणार?
आशुतोष मंगलम यांनी सांगितले की, या प्लांटमध्ये इंधन तयार करताना प्लास्टिक कचऱ्याचे प्रथम ब्युटेन आणि नंतर ऑक्टेनमध्ये रूपांतर केलं जाईल. यानंतर आवश्यक दाब आणि तापमान वापरून आयसो ऑक्टेनपासून पेट्रोल आणि डिझेल बनवले जाईल. त्यांनी सांगितले की, या प्लांटमध्ये 400 डिग्री सेल्सिअस तापमानाचा वापर डिझेल बनवण्यासाठी आणि 800 डिग्री सेल्सिअस तापमानाचा वापर पेट्रोल बनवण्यासाठी केला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.