नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : दररोजच्या आर्थिक व्यवहारांमध्ये नोटांसोबतच काही नाणीही वापरली जातात. आतापर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक पैशाच्या नाण्यांपासून अगदी 20 रुपयांपर्यंत नाणी वितरीत केली आहेत. यातील काही नाणी आता चलनामध्ये वापरली जात नाहीत. अशाच काही नाण्यांबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही 1 रुपया आणि 50 पैशांच्या नाण्यांचा संग्रह केला असेल तर या नाण्यांच्या बाबतीत ही बातमी आहे. देशातील दुसऱ्या सर्वांत मोठ्या खासगी बँकेने दिल्लीतील आपल्या शाखेबाहेर एक नोटीस चिकटवली आहे.
या नोटिशीनुसार, जर तुमच्याकडील विशिष्ट प्रकारची 1 रुपया आणि 50 पैशांची नाणी बँकेत जमा केली तर ती पुन्हा जारी केली जाणार नाहीत. आयसीआयसीआय बँकेच्या शाखेबाहेर ही नोटीस लावलेली आहे. काही नाणी पुन्हा जारी करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, ही नाणी एकदा बँकेत जमा केल्यानंतर ती बँकेकडून पुन्हा जारी केली जाणार नाहीत. संबंधित बँकांकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही नाणी परत घेईल. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : निवडणुका गुजरातमध्ये पण सुट्टी महाराष्ट्रात, या 4 जिल्ह्यातल्या नागरिकांना स्पेशल सूट!
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही नाणी कायदेशीरदृष्ट्या वैध आहेत. पण, ही नाणी फार जुनी झाल्यानं त्यांना चलनातून बाहेर काढलं जात आहे.1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ही नाणी सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय होती. आरबीआयच्या निर्देशांनुसार एकदा बँकेत जमा झालेली ही नाणी पुन्हा जारी केली जाणार नाहीत.
आरबीआयनं दिले बँकांना निर्देश
ICICI बँकेच्या शाखेतील नोटीसनुसार, सरकारने वेळोवेळी जारी केलेली विविध आकारांची, थीम आणि डिझाइनची 50 पैसे, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी वैध असतील. 2004च्या परिपत्रकात, आरबीआयनं क्युप्रोनिकेल आणि अॅल्युमिनियमपासून बनवलेली एक रुपया पर्यंतची जुनी नाणी परत घेऊन पुन्हा टांकसाळांकडे वितळवण्यासाठी पाठवण्याची सूचना बँकांना केली होती. भारत सरकारने 25 पैसे आणि त्यापेक्षा कमी किंमतीची नाणी जून 2011च्या अखेरीपासून चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर, ही नाणी कायदेशीररित्या वैध राहिलेली नाहीत.
मिळणार नवीन डिझाईनची नाणी
आरबीआयच्या गाइडलाइननुसार, ही जुनी नाणी दैनंदिन वापरातून बाहेर काढली जात आहेत. म्हणजेच बँक ही नाणी तयार करणार नाही आणि वितरित करणार नाही. पण, सध्या व्यवहारात वापरात असलेल्या नाण्यांवर अद्याप बंदी घातलेली नाही. एकदा ही नाणी तुम्ही बँकेत जमा केल्यानंतर ती व्यवहारांसाठी पुन्हा जारी केली जाणार नाहीत. तुम्हाला व्यवहारासाठी नवीन डिझाइनची नाणी दिली जातील.
आरबीआयनं व्यवहारातून रद्द केलेली नाणी
1 रुपयाची क्युप्रोनिकेल नाणी 50 पैशांची क्युप्रोनिकेल नाणी 25 पैशांची क्युप्रोनिकेल नाणी 10 पैशांची स्टेनलेस स्टीलची नाणी 10 पैशांची अॅल्युमिनियम-ब्राँझ नाणी 20 पैशांची अॅल्युमिनियम नाणी 10 पैशांची अॅल्युमिनियम नाणी 5 पैशांची अॅल्युमिनियम नाणी