नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : सेवानिवृत्तीनंतरचे जीवन (Retirement Life) सुखमय असावं, खर्चासाठी हातात पुरेसा पैसा असावा, या उद्देशानं आपण नोकरीच्या कालावधीत बचत करत असतो. या बचतीतून मिळणारी रक्कम आपली निवृत्तीनंतरच्या काळासाठीचा आधार असते. सध्या विविध प्रकारच्या पेन्शन योजना (Pension Scheme) उपलब्ध आहेत. मात्र, त्यात पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) ही योजना सर्वात लोकप्रिय मानली जाते. `पीपीएफ`मधून मिळणाऱ्या रकमेवर तुम्हाला कोणाताही कर (Tax) भरावा लागत नाही. तसेच मिळणारा रिटर्न (Return) देखील मुबलक असतो. सध्याच्या काळात बचतीसाठी सुरक्षित मार्ग म्हणून पीपीएफ योजनेकडं पाहिलं जातं. खासगी नोकरदार वर्गाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. तसेच काही सरकारी नोकऱ्यांमधून पेन्शन व्यवस्था संपुष्टात आली आहे. त्यामुळे पीपीएफ ही योजना सर्वांसाठीच फायदेशीर ठरू शकते. इतकंच नाही तर या योजनेत नियमित बचत केल्यास सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळू शकतो. `एनडीटीव्ही`ने या विषयीची माहिती दिली आहे.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना खासगी आणि सरकारी नोकरदार वर्गासाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेत नियमित बचत (Saving) केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर सव्वा दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ती देखील करमुक्त मिळू शकते. कुटुंबातील पती आणि पत्नी असे दोघंही या योजनेत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे निवृत्तीनंतर हातात साडेचार कोटींपर्यंत रक्कम मिळू शकते. या योजनेच्या माध्यमातून पती आणि पत्नी असे दोघंही 35 वर्षापर्यंत दरवर्षी कमाल 93,600 रुपयांचा (प्रत्येकी 46,800) कर वाचवू शकतात. मात्र जेव्हा गुंतवणूकदार आयकराच्या (Income Tax) कमाल स्लॅबनुसार पूर्ण 30 टक्के कर भरत असेल तेव्हा कर बचतीची रक्कम 46,800 रुपये असेल. जर गुंतवणूकदार आयकराच्या कमी स्लॅब अंतर्गत कर भरत असेल तर कर बचतीची रक्कम देखील त्यानुसार कमी होईल.
पीपीएफ योजनेंतर्गत बचत करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बॅंकेच्या शाखेत पीपीएफ अकाउंट सुरू करू शकता. या योजनेची काही वैशिष्ट्यंदेखील आहेत. सरकारची ही योजना ईईई योजनेत (EEE Scheme) समाविष्ट आहे. याचा अर्थ असा की या योजनेंतर्गत सुरू केलेल्या अकाउंटमध्ये दरवर्षी भरल्या गेलेल्या रकमेवर तुम्हाला करामध्ये सवलत मिळू शकते. तसेच दरवर्षी यावर जे व्याज मिळतं त्यावरही तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. तसेच मॅच्युरिटीच्या वेळी मिळालेली संपूर्ण रक्कम (मुख्य गुंतवणूक अधिक व्याज) देखील कराच्या कक्षेबाहेर राहते.
जगातील 'या' शहरांमध्ये राहतात सर्वाधिक अब्जाधीश, मुंबई कितव्या स्थानावर?
पीपीएफ अकाउंटमध्ये तुम्ही दरवर्षी (1 एप्रिल ते 31 मार्च अशा आर्थिक वर्षानुसार) किमान 500 रुपये ते कमाल 1,50,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. या रकमेवरील व्याज दरवर्षाच्या शेवटच्या दिवशी तुमच्या अकाउंटला जमा केलं जातं. जर तुम्ही दरवर्षी 1 एप्रिलला दीड लाख रुपये जमा केले जर वर्षाच्या शेवटी तुमच्या खात्यात कमाल व्याज जमा होईल. सध्या पीपीएफवर सरकार 7.1 टक्के दरानं व्याज (Interest) देत आहे. परंतु, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा व्याजदर (Interest Rate) खूप कमी आहे. पण तरीही पीपीएफ हा बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
पीपीएफ योजनेच्या माध्यमातून तुम्ही करोडपती बनू शकता. जर तुम्ही वयाच्या 25 वर्षी पीपीएफ खातं सुरू केलं आणि दरवर्षी 1 एप्रिलला त्यात कमाल मर्यादेत म्हणजेच दीड लाख रुपये जमा केले तर सध्याच्या व्याजदरानुसार पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत तुमच्या खात्यात व्याजापोटी 10,650 रुपये जमा होतील. यामुळे पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये शिल्लक रक्कम 1,60,650 रुपये होईल. तीच रक्कम पुढील वर्षी दीड लाख रुपये जमा केल्यानंतर 3,10,650 रुपये होईल. पुढच्या वर्षी तुम्हाला दीड लाख रुपयांऐवजी 3,10,650 रुपयांवर 22,065 रुपये व्याज मिळेल. याप्रमाणे दरवर्षी 1 एप्रिल रोजी तुम्ही दीड लाख रुपये जमा करत राहिलात तर 15 वर्षाच्या मुदतीनंतर तुमच्या अकाउंटमध्ये 40,68,209 रुपये जमा होतील. त्यामध्ये तुमची बचत 22,50,00 रुपये तर व्याजाची रक्कम 18,18,209 रुपये असेल.
जर सध्या तुमचं वय 40 वर्ष असेल आणि सेवानिवृत्तीसाठी बराच कालावधी बाकी असेल तर करोडपती होण्याची हीच खरी सुरूवात असते. या स्थितीत तुम्हाला तुमच्या पीपीएफ अकाउंटची मुदत पाच वर्षांसाठी वाढवून वार्षिक बचत कायम ठेवायची असेल तर तसं तुम्ही करू शकता. जेव्हा पुढच्यावेळी (पीपीएफ अकाउंटचे 20 वर्ष आणि तुमचं वय 45 वर्ष) अकाउंट मॅच्युरिटला येईल. तेव्हा त्यात एकूण 66,58,288 रुपये रक्कम असेल. यात तुमच्या बचतीची रक्कम 30,00,000 रुपये आणि चक्रवाढ व्याज 36,58,288 रुपये असेल.
यानंतर तुम्ही तुमच्या पीपीएफ अकाउंटची मुदत पुन्हा वाढवू (Extend) शकता. यावेळी तुमचं वय 50 वर्ष असेल. तुमच्या खात्यात एकूण 1,03,08,014 रुपये जमा असतील. यापैकी तुमची बचत 37,50,00 रुपये तर व्याजाची रक्कम 65,58,015 रुपये असेल. यानंतर जर तुम्ही पुन्हा पीपीएफ अकाउंटची मुदत वाढवली तर तुमच्या अकाउंटमध्ये 1,54,50,910 रुपये रक्कम असेल. त्यापैकी बचत केलेली रक्कम 45,00,000 रुपये आणि व्याजाची रक्कम 1,09,50,911 रुपये असेल. या स्थितीनंतर तुम्ही पीपीएफ अकाउंटची मुदत वाढवून घेतली तर तुमचं वय त्यावेळी 60 वर्ष असेल. तुमच्या पीपीएफ अकाउंटमध्ये एकूण 2,26,97,857 रक्कम जमा असेल. त्यात तुमची बचत 52,50,000 रुपये तर व्याज 1,74,47,857 रुपये असेल.
या रकमेवर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. हा पूर्णपणे व्हाईट मनी (White Money) असेल. विशेष म्हणजे या रकमेसाठी दरवर्षी तुम्ही जी बचत केली आहे, त्यावर दरवर्षी 46,800 रुपयांप्रमाणे 35 वर्षात सुमारे 16,38,000 रुपयांची बचत झालेली असेल.
पीपीएफची आणखी काही वैशिष्ट्य आहेत. सरकार दर तिमाहीत पीपीएफ अकाउंट वरील व्याज सुधारित करते. त्यामुळे व्याजदरात वाढ किंवा घट झाल्यास, तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळणारी रक्कम वाढू किंवा कमी होऊ शकते. वरती नमूद केलेली मॅच्युरिटीची रक्कम पीपीएफ अकाउंट 35 वर्ष चालवल्यानंतर प्राप्त होते. त्यामुळे अकाउंट सुरू करतेवेळी तुमचं वय 25 वर्षापेक्षा जास्त असेल तर आणि तुम्ही अकाउंटसाठी किमान चार वेळा मुदतवाढ घेतली नाही तर तुम्हाला मिळणाऱ्या रकमेत फरक असू शकतो. पीपीएफ खात्यात गुंतवणूकदाराने दरवर्षी एप्रिलच्या सुरुवातीला बचतीची रक्कम जमा करावी, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त व्याज मिळू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.