मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Paytm Share: 1,000 रुपयांच्या खाली घसरल्यानंतर पेटीएमचे शेअर्स 2.9 टक्क्यांनी वाढले

Paytm Share: 1,000 रुपयांच्या खाली घसरल्यानंतर पेटीएमचे शेअर्स 2.9 टक्क्यांनी वाढले

Paytm

Paytm

देशातील सर्वांत मोठा आयपीओ (Largest IPO) म्हणून गाजलेल्या पेटीएमच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घसरण होत असून, शुक्रवारी या शेअरनं 995 रुपयांची नीचांकी पातळी नोंदवली.

मुंबई, 14 जानेवारी: सध्या शेअर बाजारात पेटीएमच्या (Paytm) शेअरची चर्चा आहे. देशातील सर्वांत मोठा आयपीओ (Largest IPO) म्हणून गाजलेल्या पेटीएमच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घसरण होत असून, शुक्रवारी या शेअरनं 995 रुपयांची नीचांकी पातळी नोंदवली. मॅक्वेरी कॅपिटल (Macquarie Capital) या परदेशी शेअर ब्रोकर कंपनीनं पेटीएमच्या शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केल्यानं, या शेअरची विक्री वाढली आणि याची किंमत कालच्यापेक्षा अधिक गडगडली. शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर प्रथमच याची किंमत 1,000 रुपयांच्या खाली गेली आहे. या नीचांकी पातळीवर गुंतवणूकदारांनी हा शेअर खरेदी करण्याला पसंती दिली आहे.

त्यामुळं हा शेअर काहीसा सावरला. मुंबई शेअर बाजारात पेटीएमचा शेअर 1080.6 रुपयांवर पोहोचला. काल याची किंमत 1031.40 रुपये होती. आता हा शेअर 2.9 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेनं एका महिन्यात 926 दशलक्ष पेक्षा जास्त युपीआय व्यवहार केले असून, इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवहार करणारी ही देशातील पहिली लाभार्थी बँक असल्याचं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या बातमीमुळे या शेअरच्या घसरणीला लगाम लागला आणि त्याची स्थिती सावरण्यास मदत मिळाली. एबीपी लाईव्हनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

शुक्रवारी सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर काही वेळातच गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला त्यामुळं पेटीएमच्या शेअरची किंमत आणखी घसरून 995 रुपयांवर आली. शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून, आतापर्यंत या शेअरची किंमत 50 टक्क्यांहून जास्त घसरली आहे. आयपीओमध्ये (IPO) या शेअरची किंमत 2150 रुपये होती. यामुळे पेटीएमचे शेअर्स आयपीओद्वारे खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. कारण भारतीय शेअर बाजाराच्या (Share Market) इतिहासातील सर्वात मोठा 18,800 कोटी रुपयांचा आयपीओ पेटीएमने आणला होता.

मात्र मोठ्या अपेक्षेने आयपीओद्वारे शेअर बाजारात पदार्पण केल्यानंतर या शेअरमध्ये मोठी वाढ झालीच नाही, त्याचा भाव कमीच होत गेला त्यामुळं गुंतवणूकदारांना फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. हा शेअर गडगडल्यामुळं पेटीएमचे भांडवली बाजार मूल्य तब्बल 70,000 कोटी रुपयांनी खाली आलं आहे. शेअर बाजारात नोंदणीकृत होण्यापूर्वी पेटीएमचे बाजार मूल्य 1.39 लाख कोटी रुपये होते. आज 995 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आल्यानंतर त्याचे बाजार मूल्य 69 हजार कोटी रुपयांवर आले आहे.

मॅक्वेरी कॅपिटल कंपनीनं पेटीएमच्या शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली असून, याची किंमत 900 रुपये प्रति शेअर पर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. आयपीओमधील किमतीपेक्षा ही किंमत 58 टक्के कमी आहे. यामुळं या शेअरची विक्री वाढली आहे. यापूर्वीही मॅक्वेरी कॅपिटलनं पेटीएमचे लक्ष्य 1200 रुपयांपर्यंत कमी केले होते. पेटीएमच्या बिझनेस मॉडेलला निश्चित दिशा नाही. त्यामुळं नफा मिळवणे हे पेटीएमसमोरचं मोठं आव्हान आहे, असं या कंपनीनं म्हटलं आहे. तर पेटीएम कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी चुकीच्या वेळी आयपीओ आणल्याबद्दल पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण होत असल्याचं म्हटलं आहे.

First published:

Tags: Paytm, Paytm Money